Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Beed news: नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. भगवान गडाची ताकद धनंजय मुंडेंच्या पाठिशी उभी राहिल्याने मोठा दिलासा. धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचा मोठा चेहरा आहेत

बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि गुन्हेगारीला राजाश्रय देण्याच्या आरोपांमुळे राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठ्या संकटात सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या मदतीसाठी भगवान गड (Bhagwangad) धावून आला आहे. भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री (Namdev Shastri) यांनी शुक्रवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेत आपण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असा संदेश दिला. आजपर्यंत भगवान गडाचा राजकीय कारणासाठी वापर करु न देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. याकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहता येईल. धनंजय मुंडे संकटात आहेत. अशावेळी धनंजय मुंडे यांनी कालची बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असलेला भगवान गड गाठला आणि तिथेच मुक्काम केला. काल ते महंत नामदेव शास्त्री यांच्याशी बोलले आणि आज सकाळीच नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली. भगवान गड म्हणजे नामदेव शास्त्री आणि नामदेव शास्त्री म्हणजे वंजारा समाज असे समीकरण आहे. वंजारा समाजाची भगवान गडावर अपार श्रद्धा आहे. त्यामुळे येथील महंतांचा शब्द वंजारा समाजासाठी अंतिम असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठिशी ताकद उभी केल्याने त्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे.
नामदेव शास्त्री यांनी ही पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि अजित पवार यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी चर्चा आता रंगली आहे. धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचा मोठा चेहरा आहेत. त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे. धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना भेटून आले. त्यानंतर धनंजय मुंडे हे भगवान गडावर गेले. आता नामदेव शास्त्रींनी त्यांच्या पाठिशी ताकद उभी केल्यानंतरही धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांचे मंत्रीपद गेले तर वंजारी समाज तुमच्याविरोधात जाऊ शकतो. त्यामुळे धनंजय मुंडेंना हात लावाल तर खबरदार, असा संदेश भगवान गडावरुन देण्यात आला आहे का, असा सवाल आता निर्माण झाला आहे.
नामदेव शास्त्रींनी पायंडा मोडला
मध्यंतरीच्या काळात नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावरुन कुठलेही राजकारण करु नका, असे सांगत तिकडे दसरा मेळावा घेण्यास पंकजा मुंडे यांना विरोध केला होता. पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील हा वाद चांगलाच गाजला होता. मात्र, आता नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावरुन धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन एकप्रकारे राजकारणात उडी घेतली आहे. त्यामुळे नामदेव शास्त्री यांनीच भगवान गडावरुन राजकारण न करण्याचा पायंडा मोडीत काढला आहे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
नामदेव शास्त्री पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
धनंजय मुंडे भगवान गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा माणूस नाही. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदयाचे नुकसान आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली, याची मीडिया दखल का घेत नाही? धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे. पक्षाचे नेते यांनादेखील याची जाणीव आहे की, धनंजय मुंडे गुन्हेगार नाही, असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
