Satara Politics : साताऱ्यात पाच वर्षापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी अन् भाजप सेनेमध्ये मॅच टाय, यंदा कोण बाजी मारणार?
Satara MLA List : सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यापैकी 2019 काँग्रेस राष्ट्रवादीनं चार जागांवर तर भाजप सेनेनं चार जागांवर विजय मिळवला होता.
सातारा : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) बाजी मारली. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 30 जागांवर महाविकास आघाडीनं विजय मिळवला. 17 जागांवर महायुतीनं (Mahayuti) तर सांगलीच्या जागेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला. सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha Seat) भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवला. राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघात भाजप सेनेला 4 आणि काँग्रेस राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या.
2019 ला आघाडी युतीत मॅच टाय
सातारा जिल्ह्यात सातारा,वाई, पाटण, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण,फलटण आणि माण हे मतदारसंघ आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 3, शिवसेनेला 2 भाजपला 2 आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला कराड उत्तर, वाई आणि फलटण या मतदारसंघात यश मिळालं होतं. भाजपला सातारा आणि माण, शिवसेनेला पाटण आणि कोरेगाव तर काँग्रेसनं कराड दक्षिणची जागा जिंकली होती.
कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, वाईमधून मकरंद पाटील, फलटणमधून दीपक चव्हाण, कोरेगावमधून महेश शिंदे, पाटणमधून शंभूराज देसाई, साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, माणमध्ये जयकुमार गोरे आणि कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण आमदार बनले होते.
आठ मतदारसंघात कुणी विजय मिळवला?
कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून धैर्यशील कदम आणि अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांचं आव्हान होतं. बाळासाहेब पाटील यांनी 1 लाख 509 मतं मिळवली होती. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांना 51 हजार 294 मतं मिळाली. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम तिसऱ्या स्थानी राहिले होते. त्यांना 31 हजारत 791 मतं मिळाली होती. विरोधकांचं मतविभाजन झाल्याचा फायदा बाळासाहेब पाटील यांना झाला होता.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या अतुल भोसले यांचा पराभव केला होता. इथं देखील तिरंगी लढत झाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांना 92 हजार 296 मतं मिळाली. भाजपच्या अतुल भोसले यांना 83166 तर अपक्ष उमेदवार उदयसिंह पाटील यांना 29401 मतं मिळाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघात विजय मिळवण्यात यश मिळवला.
पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शंभूराज देसाई विजयी झाले होते. या मतदारसंघात दुरंगी लढत झाली होती. पाटणमध्ये शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजीतसिंह पाटणकर अशी लढत झाली होती. शंभूराज देसाई यांना 1 लाख 6 हजार 266 मतं मिळाली होती तर सत्यजीतसिंह पाटणकर यांना 92 हजार 91 मतं मिळाली होती.
सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक पवार यांच्यात लढत झाली होती. शिवेंद्र राजे भोसले यांनी या ठिकाणी विजय मिळवला होता. शिवेंद्रराजे भोसले यांना 1 लाख 18 हजार 5 मतं मिळाली होती. तर दीपक पवार यांना 74 हजार 581 मतं मिळाली होती.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले होते. महेश शिंदे यांना 1 लाख 1 हजार 487 मतं मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 95 हजार 205 मतं मिळाली होती.
वाई मतदारसंघात भाजपचे मदन भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील यांच्यात थेट लढत झाली होती. मकरंद पाटील यांनी या लढतीत विजय मिळवला होता. मकरंद पाटील यांना 1 लाख 30 हजार 486 मतं मिळाली होती. तर विरोधी उमेदवार मदन भोसले यांना 86 हजार 839 मतं मिळाली होती.
फलटण विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण आणि भाजपच्या दिगंबर आगवणे यांच्यात लढत झाली होती. दीपक चव्हाण यांनी विजय मिळवला होता, त्यांना 1 लाख 17 हजार 617 मतं मिळाली होती. भाजपच्या दिगंबर आगवणे यांना 86 हजार 636 मतं मिळाली होती.
माण विधानसभा मतदारसंघात 2019 ला तिरंगी लढत झाली होती. भाजपचे जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर देशमुख आणि शिवसेना उमेदवार शेखर गोरे यांच्यात तिरंगी सामना झाला होता. अटीतटीच्या लढतीत जयकुमार गोरे विजयी झाले होते. जयकुमार गोरे यांना 91469 मतं मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाकर देशमुख यांना 88 हजार 426 मतं मिळाली होती. शेखर गोरे यांना 37 हजार 539 मतं मिळाली होती.
सध्याचं चित्र काय?
महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभेला आमने सामने येणार आहेत. विद्यमान स्थितीत महायुतीकडे 6 आमदार आहेत. तर महाविकास आघाडीकडे 2 आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतला असता आठपैकी 5 मतदारसंघात महायुती आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी 3 मतदारसंघात आघाडीवर आहे. महायुतीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे तीन पक्ष आहेत.
संबंधित बातम्या:
Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी