Beed MLA List : राष्ट्रवादीचा 2019 ला चौकार, भाजपचे दोन आमदार , आता मविआ अन् महायुती लढणार, बीडच्या आमदारांची यादी एका क्लिकवर
Beed MLA List : महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या सर्वात संवदेनशील असा बीड जिल्हा आहे. या जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी गेल्यावेळी परळी मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुडे अशी लढत झालेली.
बीड : लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याला विधानसभेचे वेध लागलेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 30 जागांवर विजय मिळवणारी महाविकास आघाडी तर 17 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतीमध्ये विधानसभेचा सामना होईल. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) तीन ते चार महिन्यावर आली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी झाले, त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. भाजपनं विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना संधी दिलीय. त्यामुळं त्या विधानपरिषदेवर आमदार होतील. बीड जिल्ह्यात विधानसभेचे (Beed MLA List) सहा मतदारसंघ येतात. 2019 च्या तत्कालीन राजकीय स्थितीनुसार भाजपनं दोन जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसनं चार जागा जिंकल्या होत्या. बदललेल्या राजकीय स्थितीनुसार महायुतीकडे आता पाच आमदार आहेत. यामध्ये भाजपच्या दोन आणि अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांचा समावेश आहे. तर मविआकडे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे संदीप क्षीरसागर यांच्या रुपानं केवळ एक आमदार आहे.
बीडमध्ये 2019 ला राष्ट्रवादीचं वर्चस्व
महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका सप्टेंबर 2019 ला जाहीर झाल्या होत्या. तर, मतदान ऑक्टोबर 2019 मध्ये झालं होतं. बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी मतदारसंघ आहेत. या सहापैकी भाजपनं त्यावेळी गेवराई, केज या दोन जागा जिंकल्या होत्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं माजलगाव, बीड, परळी आणि आष्टीची जागा जिंकली होती.
बीड जिल्ह्यातील आमदार : 06 (Beed MLA List)
228) गेवराई विधानसभा - लक्ष्मण पवार (भाजप)
229) माजलगाव विधानसभा - प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी - अजित पवार)
230) बीड विधानसभा - संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - शरद पवार)
231) आष्टी विधानसभा - बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी - अजित पवार)
232) केज विधानसभा - नमिता मुंदडा (भाजप)
233) परळी विधानसभा - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी - अजित पवार)
2019 चे पराभूत उमेदवार
गेवराई – विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी काँग्रेस)
माजलगाव – रमेश आडासकर (भाजप)
बीड –जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
आष्टी – भीमराव धोंडे (भाजप)
केज – पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी काँग्रेस)
परळी – पंकजा मुंडे (भाजप )
लोकसभा निवडणुकीत काय घडलं?
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून बजरंग सोनवणे उभे होते. महायुतीकडील आमदारांची संख्या पाहता पंकजा मुंडे यांचं पारडं वरचढ वाटत होतं. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का बसला आणि बजरंग सोनवणे खासदार म्हणून विजयी होत लोकसभेत गेले. पंकजा मुंडे यांना माजलगाव, आष्टी आणि परळी विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली. बजरंग सोनवणे यांना गेवराई, बीड आणि केज मतदारसंघातून आघाडी मिळाली. केज आणि गेवराई या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असून देखील बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळाली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात मतदारांनी दिलेला कौल पाहता विधानसभा निवडणूक देखील चुरशीची होईल. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या :
Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी
Lok Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रातील नवे 48 खासदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा