Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
NCP Ajit Pawar Faction : महाविकास आघाडीत ठाकरे गटाने आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत.

NCP Ajit Pawar Faction : विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. अलीकडेच शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. या पाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Faction) नेत्यांनी केलेल्या वक्तव्याने महायुतीत देखील मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज शिर्डी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्यभरात प्रमुख नेतेमंडळी शिर्डीत दाखल झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत या अधिवेशनात विचारमंथन केले जात आहे. या अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...
खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अधिवेशनात पक्षाचे ध्येय-धोरण याबाबत चर्चा होईल. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था वेगळ्या आहेत. जिथे महायुती करू शकतो तिथे होईल. मात्र, जिथे नसेल तिथे वेगळा विचार होऊ शकतो. निवडणुकांनंतर पुन्हा महायुती म्हणून कसे एकत्र येता येईल, याबाबत अधिवेशनात चर्चा होईल. ज्या जिल्ह्यात आमचे आमदार, खासदार नाहीत. तिथले देखील लोक इथे आले आहेत. मुंबई महापालिकेत प्रत्येक वॉर्डात आमचे कार्यकर्ते आहेत. तिथे त्यांना ताकद देऊ आणि जिथे महायुती म्हणून जाणे शक्य आहे, तिथे एकत्र राहू, असे त्यांनी म्हटले आहे. तर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढायला देखील तयार आहे, असे त्यांनी म्हटले.
भाजपची प्रतिक्रिया
अजित पवार गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, त्यांनी जरी स्वबळाचा नारा दिला असेल तरी आम्ही महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत. स्थानिक युनिट म्हणूनच आम्ही विचार करू. दाद काय बोलले? हे आम्हाला माहीत नाही. त्यांच्या पक्षाचा निर्णय करण्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र महायुती म्हणून आम्ही सामोर जाणार आहोत. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे महायुती म्हणून लढू, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
