Adhalrao Patil : आढळराव पाटील 26 मार्चला राष्ट्रवादीत प्रवेश करणार, आढळराव पाटलांचा धक्का ठाकरे अन् शरद पवारांनाही
Pune Lok Sabha Election 2024 : आढळराव पाटलांना उमेदवारी मिळणार की पॅव्हेलियनमध्येच बसणार आणि तिकीट मिळालंच तर, लोकसभेची शर्यत जिंकणार की क्लीन बोल्ड होणार? हे येत्या 4 जूनलाच कळणार आहे.

Maharashtra Politics : निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर राजीनामे आणि पक्षांतराचं जणू पेवच फुटतं. आता या पक्षात असणारा नेता, उद्या त्याच पक्षात असेल याची कुणालाचा खात्री नसते. अशा सगळ्या वातावरणात, एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आणि ते म्हणजे, शिवाजीराव आढळराव पाटील (Adhalrao Patil). कोणे एकेकाळी तत्कालीन राष्ट्रवादी (NCP) पक्षात असलेले आढळराव पाटील (Adhalrao Patil) पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेत खासदारकीची हॅटट्रिक साधणारे, आढळराव आता अजित दादांच्या आश्रयाला गेले आहेत... त्यामुळे, आढळरावांनाच उमेदवारीची माळ मिळणार का? अशी चर्चा आता रंगली आहे.
26 मार्चला आढळराव राष्ट्रवादीत प्रवेश करणार
शिवाजीराव दत्तात्रय आढळराव-पाटील. नाव जितकं लांबलचक, तितकीच राजकीय कारकीर्दही मोठी आणि सध्या चर्चेतलंही मोठं नाव. त्याचं कारण आहे त्यांचा झालेला राजकीय प्रवास आणि तो म्हणजे राष्ट्रवादी ते राष्ट्रवादी व्हाया शिवसेना येत्या 26 मार्चला आढळराव पाटील राष्ट्रवादीत पुन्हा डेरेदाखल होणार आहेत. पण, आता आढळराव प्रवेश करत असणारी राष्ट्रवादी वेगळी आहे. तिचं रुपडं बदललंय, नेतृत्व बदलललंय आणि चिन्हही. कारण, ज्यांच्या बोटाला धरून आढळरावांनी राष्ट्रवादीत राजकीय पावलं टाकली. त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ते प्रवेश करणार नाहीत. तर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
हातावर घड्याळ, उमेदवारीची माळ?
शिवाजीर आढळराव पाटील हे तसे दीर्घ कारकीर्द असलेले, शरद पवारांच्या मुशीत तयार झालेले आणि ठाकरेंच्या झंझावातात लढलेले नेते. आक्रमक आणि सुशिक्षितही.
कशी आहे आढळरावांची कारकीर्द?
- पुण्याच्या आंबेगावजवळचं लांडेवाडी हे शिवाजीराव आढळरावांचं गाव
- कोल्हापूर विद्यापीठातून कला शाखेत पी.डी पदवी
- भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक, कारखाना उभारणीत पुढाकार
- क्रिकेट, बैलगाडा शर्यती आयोजनामुळे ग्रामीण भागांत जनसंपर्क
- शरद पवारांनी तिकीट नाकारल्याने 2004 साली शिवसेनेत प्रवेश
- 2004, 2009, 2014 साली शिवसेनेकडून तीनदा खासदार
- 2019 साली राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंकडून आढळरावांचा पराभव
लोकसभेची शर्यत जिंकणार की क्लीन बोल्ड होणार?
शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्यामुळे, एकेकाळी त्यांचा पराभव करणारे अमोल कोल्हे आणि एकेकाळी शिवसेनेतले सहकारी असलेले अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर टीकांचे बाण सोडले आहेत. हाती अनेक कंपन्या, शेतीक्षेत्रात मोठं काम, राजकारणाचा दीर्घ अनुभव, क्रिकेट आणि बैलगाडा शर्यतींचं आयोजन, अशामुळे कायम चर्चेत असणारे आढळराव उमेदवारीचं तिकीट मिळवणार की पॅव्हेलियनमध्येच बसणार आणि तिकीट मिळालंच तर, लोकसभेची शर्यत जिंकणार की क्लीन बोल्ड होणार? हे येत्या 4 जूनलाच कळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
