नवी दिल्लीत चेंगराचेंगरी, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, नियोजनाअभावी अजून किती लोकांना मरावं लागेल?
Prakash Ambedkar : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झालाय. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला संतप्त सवाल केलाय.

Prakash Ambedkar on New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर (New Delhi Railway Station Stampede) झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली. प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले. यामुळे हा गोंधळ उडाला. या अपघातात मृत पावलेल्या नागरिकांबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दुःख व्यक्त केले असून, अजून किती निष्पाप लोकांना अशा पद्धतीने मरावे लागणार आहे, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी द्यावे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री वैष्णव यांनी राजीनामा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बुलेट ट्रेन ही जनतेची प्राथमिकता नाही. तर सुरक्षित प्रवास करण्यासाठी पुरेशा सुविधा देऊन ज्या ट्रेन आपल्याकडे आहेत, त्यातच सुधारणा करावी. हा अपघात म्हणजे रेल्वेची अतिशय बेजबाबदार आणि सामान्य प्रवाशांबाबत असलेली गैरव्यवस्था आहे. चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला, त्यात महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यांच्या नातेवाईकांना मोदी आणि रेल्वेमंत्री काय उत्तर देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास, प्लॅटफॉर्म 14 आणि 15 वरील प्रवासी प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली. अचानक वाढलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने ही चेंगराचेंगरी झाली असून, अनेक नागरिक जखमी आहेत. आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

