Nashik News : मेहनतीचं फळ मिळालं! महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत सोहळा, 494 पीएसआय सेवेत दाखल
Nashik Police : नाशिकमधील (Nashik) महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत संचलन सोहळा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.
Nashik News : 'पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, मग महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये वर्षभराचे प्रशिक्षण या सगळ्यानंतर अखेर खांद्यावर स्टार आलेच. 'यावेळी कुणाच्या डोळ्यात आनंदाश्रू, कुणी आईच्या कुशीत शिरतंय, तर कुणी वडिलांना मिठी मारतंय' हे आनंदाचे क्षण नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील दीक्षांत सोहळ्यात अनुभवयास मिळाले. नाशिकमधील (Nashik) महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत संचलन सोहळा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.
नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीत (Maharashtra Police Academy) प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र.122 च्या दीक्षांत संचलन समारंभ पार पडला. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पुरस्कार्थीना सन्मानित करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील चांगल्या प्रवृत्तीचे रक्षण करुन वाईट प्रवृत्तींचा बिमोड करणे ही आपली आद्य जबाबदारी आहे. भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना समान दर्जा दिला असून कर्तव्य पार पाडताना कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भारतीय संविधानाची घेतलेली शपथ निभावण्यासाठी कायम प्राधान्य द्यावे. त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
दरम्यान प्रबोधिनीमध्ये अतिशय खडतर प्रवासातून या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यावेळी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी संचलन केले. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 122 (सरळ सेवा) चे प्रशिक्षण सत्र हे 1 ऑगस्ट, 2022 पासून सुरु झाले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागातून निवड झालेल्या 349 पुरुष आणि 145 महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश असून 1 प्रशिक्षणार्थी गोवा राज्याचे आहेत. एकूण 494 पोलीस उपनिरीक्षक यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणार्थी पैकी 88 टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर आणि 12 टक्के पदव्युत्तर आहेत, यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांनी अहवाल वाचनात दिली. प्रशिक्षण पूर्ण करुन पोलीस दलात सहभागी होत असलेल्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येणारा काळ आव्हानांचा असून रस्ते गुन्हेगारी सोबतच सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी या प्रशिक्षण प्रबोधिनीतून चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळाले आहे. या प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे पोलीस हे देशसेवेत आपले कर्तव्य बजावताना नेहमीच अग्रस्थानी असतात. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करुन प्रतिष्ठेसोबतच समाजाप्रती निष्ठा बाळगून आपली आणि देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. लोकांच्या सेवेकरता आपण पोलीस दलात रुजू झालो आहोत, शिस्तीत काम करत असताना संवेदना जिवंत ठेवल्यास आपण कर्तव्यास निश्चितपणे न्याय देऊ शकाल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे नुतन शैक्षणिक संकुल....
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई अंतर्गत 13 हजार 846 चौरस मीटर जागेत 79 कोटी 68 लाख 61 हजार 908 रुपयांचे नवीन शैक्षणिक संकुल व इतर आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 26 वर्ग खोल्या, 1 सायबर लॅब, 1 संगणक लॅब, 1 स्टाफ रुम, 1 कॉन्फरन्स हॉल असणार आहे. तसेच मोटर परिवहन विभाग इमारत, प्रवेशद्वार, टेहाळणी टॉवर, संरक्षक भिंत याप्रमाणे इतर पायाभूत सुविधा या शैक्षणिक संकुलात उपलब्ध होणार आहेत.
गौरवण्यात आलेले कॅडेट...
अभिजीत भरत काळे : यशवंतराव चव्हाण गोल्ड कप - ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅच
रेणुका देवीदास परदेशी : अहिल्याबाई होळकर कप - ऑल राऊंड वूमन कॅडेट ऑफ द बॅच
रुबिया ताजुद्दिन मुलाणी : बेस्ट कॅडेट इन ड्रिल
प्रशांत हिरामण बोरसे : "एन.एम. कामठे गोल्ड कप" बेस्ट कॅडेट इन राफल अँड रिव्हॉल्वर शूटिंग
अभिजीत भरत काळे : रिव्हॉल्वर ऑफ हॉनर - बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच
किरण सुभाष देवरे : डॉ. बी. आर. आंबेडकर कप - बेस्ट कॅडेट इन लॉ
किरण सुभाष देवरे : सिल्व्हर बॅटन - बेस्ट कॅडेट इन स्टडीज
किरण सुभाष देवरे : सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच
इतर संबंधित बातम्या :
हम है तय्यार! महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा नेत्रदीपक दीक्षांत समारंभ, शीतल टेंभे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी