Birth Certificate Scam : सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, मालेगावात राजकीय संघटना एकवटल्या
Birth Certificate Scam : मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

नाशिक : मालेगाव (Malegaon) बांगलादेशी रोहिंग्या जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळा (Birth Certificate Scam) प्रकरणी शासनाने एसआयटी (SIT) समिती स्थापन केली. त्यामुळे मालेगावला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत मालेगाव मध्यमधील काही राजकीय पक्ष संघटना एकत्र आल्या आहेत. राजकीय संघटनांकडून 'मॉयनॉरीटी डिफेन्स कमिटी'ची (Minority Defense Committee) स्थापना करून त्याविरुद्ध एल्गार पुकारल्याने मालेगावात रणकंदन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर जन्म दाखला घोटाळा झाल्याचा दावा करीत, मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एसआयटी स्थापन करून तपासही सुरु केला होता. या प्रकरणी एसआयटी चौकशीनंतर मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे (Nitinkumar Deore) व नायब तहसीलदार संदीप धारणकर (Sandeep Dharankar) यांना तात्काळ निलंबित केले. एसआयटी पथकाने मालेगावात घरोघरी जाऊन या प्रकरणाची चौकशी सुरु केली, असे असताना किरीट सोमय्या हे मालेगावमध्ये येवून मालेगावची बदनामी करीत असल्याचा आरोप मालेगाव मध्यचे नेते करीत आहेत.
सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही
मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख व समाजवादी पक्षाचे मुस्तकीम डिग्नेटी यांच्या नेतृत्वाखाली सोमय्या यांना विरोध करण्यासाठी 'मॉयनॉरीटी डिफेन्स कमिटी'ची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटी पथकाच्या चौकशीला आमचा विरोध नाही. मात्र, घरोघरी जाऊन चौकशी करू नये, अशी मागणी या समिती कडून करण्यात आली. तर किरीट सोमय्या मालेगावात येऊन कधी लव्ह जिहाद, कधी व्होट जिहाद, कधी जन्मदाखला घोटाळा, कधी बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणी मालेगावला बदनाम करीत आहे. सोमय्या यांचा हस्तक्षेप यापुढे खपवून घेतला जाणार नाही. अन्यथा 6 फेब्रुवारीनंतर समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.
लहान मुलांना जन्म दाखले देण्यास काय अडचण?
दुसरीकडे सोमय्या यांचा आरोप व नेमण्यात आलेल्या एसआयटीमुळे मालेगावात जन्म दाखले देण्यास स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्या जन्म नोंद न झालेल्या मुलांना जन्म दाखला मिळत नसल्याने त्यांचा शाळा प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मालेगावात बहुतांशी जन्म करोना काळात आणि घरीच झाला, त्यामुळे नोंद होऊ शकली नाही. वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत अडचण असेल त्यांना जन्म दाखले देऊ नका. मात्र, लहान मुलांना जन्म दाखले देण्यास काय अडचण? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे.
मालेगावात रणकंदन होण्याची शक्यता
देशात संवेदनशील शहर म्हणून मालेगावची ओळख आहे. मात्र 2001 च्या दंगलीनंतर मालेगावमध्ये एकही दंगल झाली नाही. उलटपक्षी 2006 व 2008 मध्ये शहरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतरही शहरातील हिंदू - मुस्लिमांचा सामाजिक एकोपा कायम आहे. मात्र किरीट सोमय्या यांच्या आरोप व हस्तक्षेपामुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक एकोपा बिघडण्याची स्थिती निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका व्यक्त होत आहे. शासनाने किरीट सोमय्या यांचा हस्तक्षेप थांबवावा, असा सूर सामान्य नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. आता या वादात मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनीही उडी घेतली आहे. एकीकडे किरीट सोमय्यांकडून होणारे आरोप आणि त्यावर आता मालेगाव मध्यमधील राजकीय पक्ष एकवटत करत असलेला विरोध यामुळे मालेगावमध्ये येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणकंदन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
