Jammu and Kashmir Bank : फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Jammu and Kashmir Bank GST Notice : जम्मूच्या जीएसटी आयुक्तांनी जम्मू आणि काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस पाठवली. गेल्या आठवड्यात आरबीआयने बँकेला 3.31 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

Jammu and Kashmir Bank GST Notice : जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे. बँकेकडून 8,161 कोटी रुपयांची जीएसटी मागणी करण्यासोबतच 8,161 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. म्हणजेच एकूण रक्कम 16,322 कोटी रुपये या बँकेला द्यावे लागणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बँकेचे एकूण बाजार मूल्य अंदाजे 11,300 कोटी रुपये आहे. ही बातमी समोर येताच शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली अन् कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
नोटीसनंतर बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
जम्मूच्या जीएसटी आयुक्तांनी 4 फेब्रुवारी 2025 रोजी बँकेला जीएसटीची नोटीस पाठवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारातील ट्रेडिंग सत्रादरम्यान, J&K बँकेचे शेअर्स 3.95 टक्क्यांनी घसरले आणि 99.26 रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचले. या बँकेचा शेअर 103.35 रुपयांच्या आधीच्या बंद भावाच्या तुलनेत 103.75 रुपयांवर उघडला होता. परंतु जीएसटी नोटीसच्या बातमीमुळे तो अचानक खाली पडला.
शेअर एक्सचेंजला नोटीस दिल्याची माहिती
J&K बँकेने त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटिसीची माहिती शेअर एक्सचेंजला दिली आहे. त्यामध्ये बँकेने म्हटले आहे की, त्यांना 8,161 कोटी रुपये GST भरण्यास सांगण्यात आले आहे. 4 फेब्रुवारी 2025 रोजी जम्मूच्या केंद्रीय GST आयुक्तालयाच्या सहआयुक्तांकडून त्यांच्यावर त्याच रकमेचा रकमेचा दंडही लावण्यात आला आहे. तथापि, बँकेने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की या जीएसटी मागणीचा बँकेच्या आर्थिक, परिचालन किंवा इतर कोणत्याही बँकिंग क्रियाकलापांवर कोणताही परिणाम होणार नाही.
'या' कारणावरून नोटीस आली
J&K बँकेने म्हटले आहे की, कॉर्पोरेट मुख्यालये आणि शाखांमध्ये ट्रान्सफर प्राइसिंग मेकॅनिझम (TPM) अंतर्गत मिळालेले व्याज हे वित्तीय सेवा म्हणून मानले जाते आणि त्यावर GST लावला जातो. TPM चे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे बँकेच्या विविध व्यावसायिक युनिट्समध्ये पैसे हस्तांतरित करण्यासाठी आधार प्रदान करणे होय. अशा परिस्थितीत त्यावर जीएसटी लावणे चुकीचे आहे.
नियामक कारवाई आधीच करण्यात आली
J&K बँकेवर नियामक कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही गेल्या आठवड्यात केवायसी नियमांचे योग्य पालन न केल्याबद्दल आरबीआयने बँकेला 3.31 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
ही बातमी वाचा:
























