मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे करुणा शर्मा यांनी आपली कैफीयत आता सुप्रिया सुळेंकडे मांडली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुडेंनी कृषी घोटाळा 2 केल्याची माहिती देत त्यांच्यावर 200 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दुसरीकडे आमदार सुरेस धस यांनीही धनंजय मुंडेंच्या काळातील पीकविमा घोटाळा, आणि डीपीडीसीमधील निधीत घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना आज करुणा शर्मा (karuna sharma) यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच करुणा शर्मा यांनी पोटगीसंदर्भात पती धनंजय मुंडेंविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय झाला. त्यामध्ये, धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे बजावले आहे. आता, करुणा शर्मांनी खासदार सुप्रिया सुळेंची (Supriya sule) भेट घेतली.
मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे करुणा शर्मा यांनी आपली कैफीयत आता सुप्रिया सुळेंकडे मांडली आहे. बीडमधील मस्साजोग प्रकरणी लक्ष घातल्यानंतर सुप्रिया सुळेंनी दोन दिवसांपूर्वीच बीडमधील महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणाच्या अनुषंगाने बीडला पुन्हा भेट दिली. मंत्री मुंडेंच्या निकटवर्तीयांवर होत असलेल्या आरोपींना कुणीही पाठीशी घालू नये, असे त्यांनी म्हटलं आहे. एकीकडे बीड प्रकरणात लक्ष घातलेल्या सुप्रिया सुळे यांनी आज करुणा शर्मांना भेट दिली. तसेच, त्यांची बाजू देखील ऐकून घेतली.
धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून करुणा शर्मा यांच्याकडून राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांना आपल्या तक्रारीसंदर्भाने पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनाही त्यांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. अखेर, आज करुणा शर्मा यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेऊन आपली बाजू त्यांच्याकडे मांडली आहे. या भेटीत धनंजय मुंडे यांनी कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला, याबाबतची चर्चा झाली. तसेच, सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबाबत देखील भेटीत त्यांनी माहिती दिली. करुणा शर्मा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या भेटीचा व्हिडिओ शेअर करत, माननीय सुप्रिया ताईंसोबत भेट.. असे म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोटगी संदर्भातील खटल्यात न्यायालयाने करुणा शर्मा यांना दिलासा देत पोटगी देण्याचे निर्देश मंत्री धनंजय मुंडेंना दिले आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
