रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधी; नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी
भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : देशाच्या राजधानी कमळ खुलल्यानंतर गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत (Chief minister) चर्चा सुरू होती. त्यामुळे, दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाची माळ नेमकं कोणाच्या गळ्यात पडणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. 10 वर्षे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले. तर, निवडणुकांच्या दोन महिने अगोदर आपकडून आतिशी यांना मुख्यमंत्री पदावर संधी देण्यात आली होती. त्यामुळे, भाजपकडून दिल्लीसाठी (Delhi) कोणता चेहरा पुढे येणार यावर चर्चा सुरू असतानाच आज भाजपच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. रेखा गुप्ता (Rekha gupta) यांनी भाजप आमदारांचा गटनेता म्हणून घोषित करण्यात आले. तसेच, दिल्लीच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी रेखा गुप्ता ह्याच उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असेही जाहीर केले. तर, परवेश शर्मा हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार आहेत.
भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, रेखा गुप्ता मुख्यमंत्री, परवेश शर्मा उपमुख्यमंत्री आणि विजेंद्र गुप्ता विधानसभेचे स्पीकर असणार आहेत. दिल्लीसाठी महिला नेतृत्वाला संधी देत भाजपने लाडक्या बहिणींची मनं जिंकली आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपच्या आणि दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या सोहळ्यासाठी आजच दिल्लीला जाणार असल्याची माहितीआहे. दरम्यान, संघविचारक आणि प्रचारक राहिलेल्या रेखा गुप्ता यांना भाजपने दिल्लीच्या तख्तावर बसवले आहे. रेखा गुप्ता ह्या आरएसएसच्या सक्रीय सभासद असून शालीमार बाग विधानसभेच्या आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला आहे.
#WATCH | BJP MLA-elect Rekha Gupta arrives at the party office to attend legislative party meeting
— ANI (@ANI) February 19, 2025
The name of the new Delhi CM will be announced today. pic.twitter.com/60k5xEs9fP
रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास
रेखा गुप्ता ह्या संघविचारक राहिल्या असून विद्यार्थी संघटनेपासून त्या भाजप पक्षात कार्यरत आहेत. सन 1994-95 ला दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, 1995-96 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या सचिव राहिल्या असून 1996-97 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या अध्यक्ष झाल्या. सन 2003-2004 ला भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव झाल्या, 2004-2006 ला युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव झाल्या. त्यानंतर, एप्रिल 2007 ला उत्तरी पीतमपुरा वार्डमधून भाजपच्या नगरसेवक झाल्या. तर, 2007-2009 महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्ष झाल्या. मार्च, 2010 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली, सध्या रेखा गुप्ता ह्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे.
2 वेळा विधानसभेला पराभूत
रेखा गुप्ता यांचा 2015 आणि 2020 ला विधानसभा निवडणूकीत पराभव झाला होता. मात्र, 2015 ला त्यांचा वंदना कुमारी यांनी 11 हजार मतांनी पराभव केला, तर 2020 ला त्यांचा 3 हजार 440 मतांनी पराभव झाला. मात्र, यावेळी रेखा गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला आहे.
देवेंद्र फडणवीस दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून उद्या आणि परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असणार आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असेल. परवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सोहळ्याला देखील ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, साहित्य संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर असतील. दरम्यान, 22 फेब्रुवारी रोजी गृहमंत्री अमित शाह यांचा पुण्यात कार्यक्रम, त्यावेळी पुण्यातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

