धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भातील प्रश्नावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका जाहीर करत नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला पाहिजे असे म्हटले.

मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणावरुन बीडमध्ये तणाव असून लोकप्रतिनिधींकडून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याप्रकरणी अटकेतील आरोपी हे धनंजय मुंडेंचे जवळचे असून खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हेही त्यांचे निकटर्तीय असल्याचे सांगण्यात येते. त्यातच, बीडमधील दहशत व गुंडगिरीला धनंजय मुंडेच (Dhananjay munde) जबाबदार असून कृषिमंत्री असतानाही त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत कृषी खात्यात कसा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला हे माध्यमांसमोर मांडले. त्यानंतर, धनंजय मुंडेंनी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला होता. यासंदर्भातील एका प्रश्नावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मी असतो तर नैतिकता जपत राजीनामा दिला असता, असे म्हटले. त्यावरुन, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रताप सरनाईक यांचं कौतूक करत धनंजय मुंडे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलय.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भातील प्रश्नावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका जाहीर करत नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला पाहिजे असे म्हटले. नैतिकता आणि लोकाग्रहास्तव या दोन भूमिका वेगवेगळ्या आहेत. नैतिकतेला धरुन राजीनामा देणं हे शंभर टक्के तेवढचं खरं आहे, माझ्यावरही असे काही आरोप झाले तर मी दुसऱ्या सेकंदाला राजीनामा देईन, असे प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते. आता, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्याचा संदर्भ देत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे भूमिका घेतल्याबद्दल सरनाईक यांचे अभिनंदन केलं आहे. कारण, प्रताप सरनाईक हे सध्या मंत्रिमंडळात असून धनजंय मुंडेंचे मंत्रालयातील सहकारी देखील आहेत.
आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले की, उघडपणे भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आपल्या अंगावर आले की दुसर्याच्या अंगावर ढकलून द्यायचे, ही अनेकांना सवय असते. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे खापर फोडण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळातील 'आका' धनंजय मुंढे यांनी केला आहे. भ्रष्टाचार करायला एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. उपद्व्याप करायचे यांनी आणि खापर दुसऱ्यावर फोडायचे; किती जणांवर असे खापर फोडून जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करणार? असा सवालच आव्हाड यांनी धनंजय मुंडेंना विचारला आहे. तसेच, अनेकजण उघडपणे भूमिका घ्यायला घाबरता. पण, प्रताप सरनाईक यांनी उघड भूमिका घेतली, नैतिकतेवर राजीनामा द्यावा, असे मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्याने थेट सूचवले आहे. तरीही, प्रताप सावध रहा ! आतापर्यंत अजित पवार यांचा फोन आला असेल, "प्रताप, शांत बस.!!" असे म्हणत अजित पवारांवरही आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.
हेही वाचा
राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा






















