Karla Sofia Gascon Old Tweet Row : ट्वीटनं केला कार्लाचा गेम; ऑस्करपासून मुकणार?

Karla Sofia Gascon Old Tweet Row : तुमचा भूतकाळ तुम्हाला कधीच सोडत नाही. आजच्या डिजिटल जगात तर नाहीच नाही. तुमचे डिजिटल फुटप्रिंट सतत पाठलाग करतात. यामुळं तुम्ही एका क्षणात उध्द्वस्त होऊ शकता. सध्या हा अनुभव अभिनेत्री कार्ला सोफिया गॅसकॉन (Karla Sofia Gascon) घेतेय. एमिलिया पॅरेझ (Emilia Pérez) या सिनेमासाठी तिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचं ऑस्कर नामांकन जाहीर झालंय. या कॅटेगरीत नामांकन मिळालेली ती पहिली ट्रान्सवुमन अभिनेत्री ठरलेय. इतिहासात हे प्रथमच घडतंय. पण आता तिच्या डिजिटल भूतकाळानं कार्लाचा घात केला. मुस्लिम समाज आणि रंगभेदाबद्दल कार्लानं केलेल्या ट्विटमुळं ती वादाच्या भोवऱ्यात अडकलेय. हातातोंडाशी आलेला ऑस्कर पुरस्कार हातातून निसटण्याची नामुश्की कार्लावर येण्याची शक्यता आहे. कारण एमिलिया पॅरेझ सिनेमाची निर्मीती करणाऱ्या नेटफ्लिक्सनं ऑस्कर प्रमोशनच्या पोस्टरमधून कार्लाला काढून टाकलंय. एमिलिया पेरेज या फ्रान्स सिनेमानं 13 नामांकनासहित इतिहास रचला आहे.
हे वर्ष कार्ला सेफिया गॅसकॉनसाठी खास होतं. एमिलिया पॅरेझसाठी तिला कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदा पुरस्कार मिळाला. ती सिनेमातली मध्यवर्ती भूमिका करतेय. एमिलिया पेरेझची. त्यानंतर जगाच्या पाठीवर जे जे महत्त्वाचे फिल्म फेस्टिव्हल झाले तिथं तिथं कार्लाच्या अभिनयाला उचलून धरण्यात आलं. नुकत्याच झालेल्या प्रतिष्ठीत गोल्डन ग्लोब्स पुरस्कारासाठी तिला उत्कृष्ठ अभिनेत्रीचं नामांकन मिळालं होते. त्यानंतर आता ऑस्करचं नामांकन. एक ट्राम्सवुमननं घडवलेल्या या इतिहासाबद्दल तिची जगभरात वाहवा झाली. जगातला कुठलाही पुरस्कार सोहळा किंवा फिल्म फेस्टिव्हल उरला नाही जिथं कार्लाला नामांकन आणि पुरस्कार मिळालं नाही. हे तिच्यासाठी स्वप्नवत आहे, असं ती नेहमी म्हणायची. पण आता तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झालेय.

2016 ते 2022 दरम्यान कार्ला सोफिया गॅसकॉननं मुस्लिम धर्माविरोधात अनेक ट्वीट केले होते. खासकरुन अरब देशांतल्या मुस्लिंमवर तिचा रोख होता. युरोपातलं मुस्लिमांचं स्थलांतर आणि तिथं घडणाऱ्या अनेक घटनांबद्दल कार्लानं केलेल्या ट्विटमधून सतत भाष्य केलं होतं. या ट्विट्सला रंगभेदाचीही किनार होती. कॅनडातली पत्रकार सराह हॅगीनं कार्लाचे हे ट्वीट शोधून काढले. आठवड्याभरापूर्वी या वादाला सुरुवात झाली. सराहनं कार्लाचे असंख्य ट्वीटचे स्क्रिनशॉट घेऊन ते ट्विटरवर टाकले. 23 जानेवारीला एमेलिया पॅरेझ सिनेमाला 13 नामांकनं जाहीर झाली होती. त्यात कार्लाचं नामांकनही होते. याला सराह हॅगीच्या ट्विट्सनं सुरुंग लावला. आता 11 फेब्रुवारीला जगभरात पसरलेले 10 हजारहून जास्त ऑस्करचे वोटर्स आपलं मत देणारेत. हा मतदानाचा दुसरा टप्पा आहे. सिनेमासाठी हे परवडणारं नाही. याचा अंदाज घेत नेटफ्लिक्सनं कार्लाला सिनेमाच्या प्रमोशनल पोस्टर्समधून उडवून टाकलं. हे ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदा घडतंय की कुठल्या कंपनीनं आपल्या सिनेमातली मुख्य पात्रं असलेल्या पात्रालाच प्रमोशनमधून बाद केलंय. आता 3 मार्चच्या मुख्य कार्यक्रमात कार्लाच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत.
it’s so insane that karla sofía gascón still has these tweets up. straight up have never seen tweets this racist from someone actively campaigning to win an ACADEMY AWARD. there are more than a dozen… pic.twitter.com/1rcNzkJXuo
— sarah hagi (@KindaHagi) January 30, 2025
फक्त मुस्लिमांबद्दल नव्हे तर अमेरिकेतल्या जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर केलेली कार्लाची ट्वीट वादग्रस्त आहेत. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेत ब्लॅक लाइव मॅटर्स हे मोठं आंदोलन झालं. त्यावर कार्लानं केलेले ट्वीट हे अतिशय वादग्रस्त आणि रंगभेद करणारे आहेत.
पत्रकार सराह हॅगीनं पर्दाफाश केल्यानंतर कार्लानं आपलं ट्विटर अकाउंट डिलीट केलं आहे. किती ही डिलीट करा, डिजिटल फुटप्रिट तुमची पाठ सोडत नाही. कार्लानं माफी मागितलेय. पण आता त्याचा उपयोग होईल असं वाटत नाही.
जेंडर ट्रान्सिशन ऑपरेशननंतर 2018 ला कार्सियाची कार्ला झाली. तिला एक 13 वर्षांची मुलगी ही आहे. गेली 30 वर्षे ती सिनेमा आणि सिरीयल्समध्ये काम करतेय. ऑपरेशननंतर कार्सिया - एन एक्सट्राऑर्डनरी स्टोरी हे आपलं आत्मचरीत्र प्रसिद्ध केलं. यापुढे कार्ला सोफिया गॅसकॉन या नावानं ओळखले जाऊ असं तिनं घोषित केलं. एमिलिया पॅरेझ सिनेमाचं कथानक ही असंच आहे. मॅक्सिकोमधला एक ड्रग्स माफिया जेन्डर ट्रान्सिशन करतो.
गेल्या काही वर्षांपासून ऑस्कर पुरस्काराचं मतदान हा चर्चेचा विषय बनलाय. जवळपास 10 वर्षांपूर्वी ऑस्कर इज सो व्हाईट या सोशल मिडीया ट्रेन्डनं ऑस्कराच्या मतदानावर प्रश्न उभे करण्यात आले होते. हे मतदान रंगभेदी असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर अकादमीनं असा काही वाद उभा राहणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली. कार्लाच्या ट्विटरमुळं हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.
























