छावा चित्रपटाचं स्क्रिनिंग अचानक बंद, प्रेक्षक खवळले, शिवसेना नेते PVR मध्ये पोहोचले; नेमकं काय घडलं?
Chhaava Film : छावा चित्रपटाला महाराष्ट्रासह देशभरात चांगला प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

Chhaava Film : सध्या छावा या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत 150 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर हा चित्रपट असल्यामुळे महाराष्ट्रात तर या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. दरम्यान, लोअर परळमध्ये या चित्रपटाच्या शोदरम्यान स्क्रीन बंद असल्यामुळे प्रेक्षक चांगलेच संतापल्याची घटना घडली. विशेष म्हणजे तब्बल तीन तास प्रेक्षकांना ताटकळत बसावं लागल्यानं चित्रपट पाहण्यासाठी दिलेले पैसे परत करण्याचे आश्वासन संबंधित सिनेमागृहाने दिले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील लोअर परळ येथील पीव्हीआर चित्रपटगृहात चाा चित्रपटाचे स्क्रीनिंग बद होते. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना तब्बल तीन तास ताटकळत बसावे लागले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार सुनील शिंदे हेदेखील थेट पीव्हीआरमध्ये पोहोचले. तेथे जाऊ त्यांनी पीव्हीआरच्या प्रशासनाला जाब विचारला. सुनिल शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पीव्हीआर प्रशासनाने प्रेक्षकांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय प्रेक्षकांना चित्रपट पाहायचा असेल तर ते पुढील आठवड्यात येऊन बघू शकतात असं पीव्हीआर व्यवस्थापनाने सांगितलं आहे.
विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत
छावा या चित्रपटाचा सध्या सगळीकडे बोलबाला आहे. या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई यांचे पात्र साकारले आहे. बादशाहा औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना या कसलेल्या अभिनेत्याने केली आहे. या तिन्ही कलाकारांच्या कामाचे देशभरातून कौतुक केले जात आहे.
बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद
दरम्यान, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद लाभतोय. अवघ्या पाच दिवसांत हा चित्रपट कमाईच्या बाबतीत 200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. छावा हा चित्रपट या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला आहे.
हेही वाचा :
शाळा अन् कॉलेजसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात दाखवा 'छावा'; शिंदेंच्या आमदाराचं CM फडणवीसांना पत्र























