'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का?
Santosh Deshmukh Murder Case : नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे त्यांच्या मंत्रिपदाचा त्याग करणार की आणखी काही काळ हा दबाव झुगारणार हे पाहावं लागेल.

बीड : मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणात आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं जाणाऱ्यांची आणि आरोप करणाऱ्यांची यादी ठरलेली आहे. फक्त आरोपांचं स्वरूप आणि तीव्रता दररोज बदलत जाते. आजचा दिवसही त्याला अपवाद नाही ठरला. प्रश्न एवढाच आहे की दररोज नवनवीन राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गर्दीत मूळ प्रश्न हरवत चाललाय का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
धनंजय मुंडेंवर आज मनोज जरांगे, संजय राऊत आणि अंजली दमानिया असा तिहेरी हल्ला सुरुच राहिला. या तिन्ही नेत्यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीच्या निमित्ताने काही गंभीर आरोप सुद्धा केले. त्याला वडेट्टीवारांचीही साथ मिळाली. राऊतांनी तर ट्रॅप, बॉस, बॉसचा बॉस या शब्दांवर खेळत धमाल उडवून दिली.
सुरेश धसांवर आरोपाच्या फैरी
धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळे सुरेश धसांवरील मराठा समाजाचा विश्वास उडाला असं मनोज जरांगे म्हणाले. यामुळे संतोष देशमुख खून प्रकरणाच्या चार्जशिटमध्ये सुद्धा छेडछाड होण्याची शक्यता आहे असंही जरांगे म्हणाले. तर मुंडे-धस भेटीमागे मोठी डील झालेली आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.
संतोष देशमुख हत्येनंतर, रोजचा सूर्य नवीन आरोपांसह उगवतोय. आधीच देशमुख कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे बीड पोलिस संशयाच्या गर्तेत सापडलेत. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी, चार्जशीटमध्येच छेडछाड झाल्याची शक्यता वर्तवली आहे. हा संशय व्यक्त करताना त्यांनी बोट ठेवलंय ते धस आणि मुंडेंच्या गपचूप झालेल्या भेटीवर.
विरोधकांना आयती संधी
आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे टीकेची झोड उठवण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीच धसांसाठी ट्रॅप लावला होता असा संशय व्यक्त करताना यामागे मोठी डील झाल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी धस-मुंडे भेटीचा किस्सा पप्पीपर्यंत नेऊन पोहोचवलाय. सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे पप्पी घेण्यासाठी भेटले होते का असा प्रश्न त्यांनी विचारला.
या सगळ्या नव्या आरोपांचं भाजपकडून खंडण करण्यात आलं. मस्साजोगच्या नागरिकांना सबुरीचा सल्लाही देण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, "प्रदेशाध्यक्ष यांनी बोलावल्यावर जाणं आमचं काम आहे. त्यामुळे सुरेश धसांवर कुठलाही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं नाही. धसांवर दबाव आणण्याची गरज नाही. विषय समाजाचा नाही तर गुन्हेगारीचा आहे."
मस्साजोगच्या नागरिकांनी थोडा धीर धरला पाहिले, तपास योग्य दिशेने सुरु असल्याचं खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
अंजली दमानियांचे टार्गेट कायम
राऊत, जरांगे आणि वडेट्टीवारांनी गुप्त भेटीवरून धस-मुंडेंना लक्ष्य केलं. तर अंजली दमानियांनी त्यांचं टार्गेट कायम ठेवलंय आणि ते म्हणजे धनंजय मुंडें आणि धनंजय मुंडेंच्या खांद्यावरून अजित पवारांवर साधलेला निशाणा. तारीख नसलेल्या पत्रावर सही करून धनंजय मुंडे यांनी 200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला.
अजंली दमानियांच्या आरोपांचं खंडन करण्याचे सोपस्कार धनंजय मुंडेंच्या कार्यालयाने नेहमीप्रमाणे पार पाडले. जीआर काढण्याची प्रक्रिया समजून घेण्याचा सल्ला त्यांनी अंजली दमानियांना दिला.
मस्साजोग प्रकरण असं चिघळत असतानाच परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाने आज वेग घेतला. तपास पथक परळीत असतानाच महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांवर स्फोटक आरोप केले.
संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंना न्याय मिळणार का?
मस्साजोग असो की परळी, विरोधकांचं मुख्य लक्ष्य आहेत धनंजय मुंडे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांचा राजीनामा मागणं सुरुच आहे. त्याला आता कृषी विभागातील घोटाळ्याची जोड मिळाली आहे. विरोधकांना खरंच यश येईल की धनंजय मुंडे आणखी काही काळ हा दबाव झुगारु शकतील याकडे आपलं लक्ष असेल. पण या सगळ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंना न्याय कितपत मिळणार? हे पाहावं लागेल.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

