(Source: ECI | ABP NEWS)
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना, माझ्यामागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली.

पुणे : जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरेंनी (Shirish more) आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या आत्महत्येची कारणे समोर आली आहेत. मृत्यूपूर्वी त्यांनी 4 चिठ्ठ्या लिहून आपण हे टोकाचं पाऊल का उचलत असल्याचे स्पष्ट केले. देहूतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री ते जेवण केल्यानंतर झोपायला गेले. मात्र, सकाळी खोलीचे दार उघडलेले दिसेना. त्यामुळं दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं. आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये शिरीष महाराज मोरे यांनी नमूद केलं होतं. या घटनंतर समाजमाध्यमं व समजात कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्यांनी कोणाचे कर्ज बुडू नये याची काळजी घेत आपल्यावरील कर्ज फेडण्याचं आवाहन निकटवर्तीय व कुटुंबीयांना केलं. यातून त्यांच्या मनातील व संस्कारातील संत तुकाराम महाराजांचा (Tukaram maharaj) आदर्श दिसून येत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. तसेच, या दुर्दैवी घटनेनंतर कर्जबाजारीपणाची होणारी चर्चा वेदनादायी व दु:खद असल्याचंही मोरे कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना, माझ्यामागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली. यामार्फत शिरीष महाराजांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली. मात्र, त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असं म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं मोरे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अनेकजण किर्तनावर मोठे होत आहेत, मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफत किर्तनसेवा केली. फक्त यावेळी जरा गडबड झाली अन् दुःखाचा डोंगर वारकरी संप्रदायावर कोसळला. शिरीष महाराजांनी एकवेळ आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता, अशी खंत ही देहूकर व्यक्त करत आहेत. शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आधार घेत, देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
विशाळगड अतिक्रम हटाव मोहिमेत सहभाग
शिरीष महाराज हे श्री शंभू विचार मंचच्या माध्यमातून ते कार्य करत होते. शिरीष महाराज धर्मवेडे होते, धर्माच्या रक्षणासाठी ते रात्रंदिवस झटणारे व्यक्तिमत्व होते. विशाळगड अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेतही त्यांनी मोठा पुढाकार घेतला होता, असे देहू संस्थानचे अध्यक्ष, पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी म्हटलं आहे. संभाजी महाराजांच्या विषयाचे प्रबोधन ते करायचे, आमचा उगवता तारा मावळल्याने आम्हाला अतिशय दु:ख झाल्याचंही पुरुषोत्तम महाराज यांनी म्हटलं.
हेही वाचा
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
























