PWD high Expenditure: सनदी अधिकाऱ्यांच्या इमारतीला लाखोंचं ग्रेनाइट, जुन्या कामांची नव्याने बिलं काढली, सार्वजनिक बांधकाम विभागाची उधळपट्टी
Maharashtra Govt: राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकून मंत्र्यांचे बंगले आणि सरकारी कार्यालयांमध्ये नुतनीकरणासाठी लाखोंची उधळपट्टी केली जात असल्याची बाब समोर आली आहे. यशोधन इमारतीत लाखोंचं ग्रेनाईट
मुंबई: विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आल्यात आणि अनेक विभागाचे टेंडर मागून टेंडर निघताना पाहायला मिळतात. मात्र, यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार वारंवार चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतोय. मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयावरती लाखो रुपयांची उधळपट्टी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD Department) कार्यालय आणि सनदी अधिकाऱ्यांची रहिवासी इमारत यावर उधळपट्टी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं करणारा कंत्राटदार महाराष्ट्रात मेटाकुटीला आला आहे. जवळपास 35 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. या कंत्राटदारांनी अनेकदा काम बंद आंदोलन पुकारले आहे. आत्महत्या करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. पण राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याच सांगत या कंत्राटदारांची बिलं थांबून ठेवली आहेत. तर मुंबईतील मंत्र्यांचे बंगले, त्यांची कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालय आणि सनदी अधिकाऱ्यांच्या इमारतींवरती करोडो रुपयांची उधळपट्टी होताना दूसरीकडे पाहायला मिळत आहे. मंत्र्यांची बंगले आणि कार्यालयावरती करोडो रुपयांची उधळपट्टी होत असल्याचं 'एबीपी माझा'ने समोर आणल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावरती आणि सनदी अधिकाऱ्यांच्या इमारतीवरती लाखो करोड रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे उघड झाले आहे.
सनदी अधिकाऱ्यांच्या इमारतीमध्ये लाखोंचं ग्रेनाईट
मंत्रालय परिसरात असलेली ही यशोधन इमारत, या इमारतीमध्ये सर्व सनदी अधिकारी राहतात. या इमारतीच्या वॉल कंपाऊंडसाठी गेल्यावर्षी 35 लाखाचं ग्रॅनाईट लावण्यात आलं होते. आता पुन्हा एकदा त्याच ठिकाणी 24 लाख रुपयांचा ग्रॅनाईट लावण्यासाठी टेंडर काढण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ग्रेनाईट फारच खर्चिक असल्याने कुठे ही शासकीय ठिकाणी वापरलं जात नाही
यशोधन इमारतीच्या वॉल कंपाऊंडची ही गाथा आहे. मात्र, याच इमारतीमध्ये सदनिका क्रमांक 32 दुरुस्ती व रंगकाम यासाठी 17 लाख रुपये, ए आणि बी टाईप सदनिका दुरुस्ती व रंगकाम यासाठी २० लाख रुपये. इमारतीच्या रंग कामासाठी आणि प्लास्टरसाठी 17 लाख रुपये दाखवत आणखी टेंडर काढण्यात आलेले आहे.
गरज नसताना निविदा काढून कोट्यवधींची उधळपट्टी
ही अनागोंदी इथेच थांबत नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या कार्यालयावरती ही करोडो रुपयांची उधळपट्टी होताना पाहायला मिळतेय. मलबार हिल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच हे कार्यालय आहे. या ठिकाणीही अशीच उधळपट्टी पाहायला मिळते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मलबार हिल कार्यालयात वेगवेगळ्या निविदा काढून जवळपास 60 लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे. फॉल सीलिंग, प्लास्टर, रंगकाम यासाठी २० लाखाची निविदा काढण्यात आली आहे. याशिवाय, टेबल, पार्टिशन, रंगकाम यासाठी पुन्हा 20 लाख रुपयांची निविदा काढण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढंच नाही तर हे कार्यालय असताना या कार्यालयात किचन दाखवून त्याची दुरुस्ती आणि इतर पॅनेलिॅगसाठी पुन्हा तिसरी निविदा 20 लाखांची काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे कार्यालय ही सुस्थितीत आहे. काम व्यवस्थित आहे. अलिशान कार्यालय आहे. प्लास्टरची गरज नसताना आणि किचन नसताना ही दुरुस्ती दाखवत 60 लाख रुपये खर्च दाखवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे ही अफरातफर इथेच थांबत नाही . तर ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची मालमत्ता आहे किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग डागडूजी करत आहे. त्या सर्वच ठिकाणी हा प्रकार पाहायला मिळतोय. जुनीच काम नव्याने केल्याचे दाखवून करोडो रुपयांची बिल दाखवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावताना पाहायला मिळत आहे. ही प्रकरण उघडकीस आल्यानंतरही या अधिकाऱ्यांवर कारवाई होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे की संगणमतानेच हे सर्व सुरू आहे असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
आणखी वाचा
गुलाबी गॅंगने पैशांची उधळपट्टी लावलीय, सरकारच्या पैशावर यात्रा, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला