बीडमधील शिक्षक नागरगोजे यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे सरसावल्या; 'गुरुजी'प्रश्नी शासनाला दाखवला आरसा
शिक्षक हा समाज व्यवस्थेचा कणा मानला जातो, समाज आणि भावी पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षक वर्गावर आहे.

मुंबई : बीड जिल्ह्यातील एका आश्रम शाळेवर तब्बल 18 वर्षे शिक्षक (Teacher) म्हणून नोकरी केल्यानंतरही ना पगारीचा पत्ता, ना कायम होण्याची शाश्वती, त्यातच संस्थाचालकांकडून होणारा त्रास असह्य झाल्याने एका तरुण शिक्षकाने आपले जीवन संपवले. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन भावनिक पोस्ट लिहत धनंजय नागरगोजे यांनी मृत्यूला जवळ केले. या घटनेनं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून ही घटना मन सुन्न करणारी आहे. धनंजय नागरगोजे हे बीडच्या (Beed) केळगाव येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. गेल्या 18 वर्षापासून ते या शाळेत काम करत होते, मात्र अठरा वर्षापासून त्याना पगार न मिळाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यातूनच, त्यांनी गळफास घेत आपले जीवन संपवले. या घटनेनंतर विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न नव्याने चर्चेत आला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही बीडच्या घटनेचा उल्लेख करत सरकारपुढे प्रश्न मांडले आहेत. तसेच, शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
शिक्षक हा समाज व्यवस्थेचा कणा मानला जातो, समाज आणि भावी पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षक वर्गावर आहे. मात्र, विनाअनुदानित शाळांमुळे शिक्षकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न नेहमीच चर्चिला जातो. एकीकडे शिक्षकांच्या पगारीवरुन अनेकदा टोमणे मारले जातात, शिक्षकांना मिळणारा पगार जास्त असल्याची चर्चाही होते. मात्र, विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांचा प्रश्न गंभीर आहे. ज्या संस्थेवर हा शिक्षक काम करत असतो त्या संस्थाचालकाकडून पगार नसतानाही वेठ बिगारी मजुराप्रमाणे त्यांच्याकडून कामे करून घेतली जातात. वर्षानुवर्षे त्याला त्याच्या कामाचा मोबदला दिला जात नाही, मग त्याने घर चालवायचे कसे? या प्रश्नाचं उत्तर ना संस्थाचालक देतो ना शासन. याच विवंचनेतून बीडमधील एका विना अनुदानित शिक्षकाने फेसबुक पोस्ट करत आपले जीवन संपवल्याच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला आहे. तसेच, विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्नही यानिमित्ताने समोर आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विटरवर पोस्ट लिहित सरकारला आरसा दाखवला आहे.
बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे या शिक्षकाची आत्महत्या अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले. त्याच महाराष्ट्रात शिक्षकाला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागतो हे राज्याला भूषणावह नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तसेच, शिक्षकांना आदराने 'गुरुजी' म्हटले जाते. हे गुरुजी भावी पिढ्या घडविण्यासाठी सदैव काम करीत असतात. त्यांचे प्रश्न व अडचणी शासनाने समजून घेतल्या पाहिजेत. शासनाने त्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक व संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटले तर अशा घटना घडणार नाहीत. दिवंगत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बीडमधील नागरगोजे यांच्या आत्महत्येबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे या शिक्षकाची आत्महत्या अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले. त्याच महाराष्ट्रात शिक्षकाला आत्महत्येचा…
— Supriya Sule (@supriya_sule) March 16, 2025
20 हजार शिक्षकांना कोणतेच अनुदान नाही
दरम्यान, राज्यभरात 3500 विना अनुदानित शाळेत 70 हजारांपेक्षा जास्त शिक्षक आहेत. त्यातील 700 शाळेतील 20 हजार शिक्षकांना अजून कोणतेच अनुदान नाही. तर उर्वरित शिक्षकांना 20 टक्के ते 80 टक्के दरम्यान अनुदान मिळते. पण, पुढचे टप्पे वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे, विना अनुदानित व टप्पा अनुदानित शिक्षकांकडून सातत्याने शासन दरबारी मागणी केली जात आहे.

























