घरातील कुलदैवतेच्या एकदा पाया पडू द्या, अखेरच्या घटका मोजत असलेल्या पतीसाठी सासूची सुनेविरोधात हायकोर्टात धाव
Mumbai High Court News : गेल्या वर्षी सुनेनं तिच्या सासू आणि सासऱ्याला घराबाहेर काढलं, आता नातू आजारी असला तरी त्याला भेटू देत नसल्याची तक्रार करत सासूने सुनेच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : अखेरच्या घटका मोजत असलेल्या आपल्या पतीला घरातील कुलदैवतेला दंडवत घालू द्यावा, अशी विनवणी करणारी याचिका सासूनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. वकील स्वप्ना कोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. आपल्या पतीला कर्करोग आहे, त्यांचा श्वास कधी थांबेल याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांना घरातील कुलदैवतेचं एकदा दर्शन घेऊन नतमस्तक व्हायचं आहे. पण सून घरात घेत नाही, अशी तक्रार या याचिकेतून करण्यात आली आहे.
या याचिकेवर गुरूवारी न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर तातडीची सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयानं मान्य केली आहे.
काय आहे प्रकरण?
याचिकाकर्ती सासू ही सध्या तिच्या पतीसोबत पेणमध्ये सध्या वास्तव्य करत आहे. त्यांचे तिथून काही अंतरावरच हक्काचं घर आहे. त्या घरात त्यांच्या कुलदैवता आहेत. सध्या तिथं लहान मुलगा आणि सून राहतात. मात्र सून सतत सासू सासऱ्यांशी वाद घालायची. सुनेनं अखेर त्यांना घराबाहेर काढले. गेल्यावर्षीच पतीला कर्करोगाचं निदान झाल असून त्यांची परिस्थिती सध्या बिकट आहे. तरीही सून घरात घेत नाही असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
कुलदैवता असलेलं पेण येथील घर 90 वर्षे जुनं आहे. हे घर सासऱ्याचं आहे. त्यांनं हे घर आपल्या लहान मुलाला दिलंय. तिथंच या सूनेचा दवाखानाही आहे. नातू आजारी असताना त्यालाही सून भेटू देत नाही. त्यालाही भेटायचं आहे, अशी आर्त विनंती करत सासूनं हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
