80 वर्षांच्या दिव्यांग वृद्धा पासून प्रेरणा घेत अवघ्या 32 मिनिटांत 'गुरुजीं'नी पोहून पार केलं 580 मीटरचं अंतर
जिद्द, चिकाटी व प्रबळ इच्छाशक्ती, ध्येय डोळ्यासमोर ठेवून 49 वर्षीय प्राथमिक शिक्षक कैलास बच्छाव यांनी ही किमया केली.

पिंपळनेर : जिद्द, चिकाटी व प्रबळ इच्छाशक्ती, ध्येय डोळ्यासमोर ठेवून 49 वर्षीय प्राथमिक शिक्षक कैलास बच्छाव यांनी येथील लाटीपाडा धरणात न थांबता 580 मीटर अंतर अवघ्या 32 मिनिटांत पोहून पार केले. कैलास बच्छाव चिंचदर (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असून, सध्या पिंपळनेर येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी पांझरा नदीवरील लाटीपाडा धरणात काही दिवसांपूर्वी पोहण्याचा सराव सुरू केला.
सराव करतानाच शुक्रवारी तब्बल 580 मीटर अंतर 32 मिनिटांत पार केले. वीस वर्षांपूर्वी जेव्हा आपण पोहत होतो, त्या वेळी 60 ते 70 मीटर अंतर एका दमात पार करत असे. मात्र, पंधरा ते वीस वर्षांपासून पोहणे बंद होते. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात सुट्या होत्या. त्याचदरम्यान टीव्हीवर बीड जिल्ह्यातील 80 वर्षांच्या दिव्यांग वृद्धाने तरुणांना लाजवेल अशी बाइक चालवल्याचा व्हिडिओ बघितला. त्यातून मिळालेल्या ऊर्जेतून आपल्यालाही चांगलं पोहता येतं, त्यात काहीतरी नावीन्य करावं, असा निर्णय घेतला.
पोहणे उत्तम व्यायामही आहे.म्हणून रोज लाटीपाडा धरणात पोहण्याचा सराव सुरू केला. 50 ते 60 मीटर अंतर रोज पोहत होतो. एके दिवशी धरणाच्या सांडव्याचे 290 मीटर अंतर पार केले. पुन्हा जिद्द, चिकाटीने परत येताना तेवढेच अंतर पोहण्याचे ठरवले. त्यानुसार हे 580 मीटर अंतर अवघ्या 32 मिनिटांत पार केले. दरम्यानच्या काळात मुलाचाही एकाच आठवड्यात पोहण्याचा सराव करून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
Corona Warning | कोरोनाला हलक्यात घेणं महागात पडलंय का?
पोहायला येणे ही एक कला आहे. आत्मसात केली तर ती माणसाच्या जीवनाला तारक ठरते. खरं म्हणजे पाणी पाहिलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते मात्र, अवघड काम करताना मनात विनाकारण भीती बाळगू नये. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त मनात जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच अशक्य गोष्टी आपण शक्य करू शकतो ही खुणगाठच बांधण्याची यावेळी गरज असते.
पुस्तकी शिक्षणाचे धडे गिरवण्याबरोबरच आपल्या नजरेला भुरळ घालणारी कोणतीही गोष्ट आत्मसात करायची असेल तर त्यासाठी जिद्द चिकाटी प्रबळ इच्छाशक्ती डोळ्यासमोर ठेवूनच करावी असे मत शिक्षक कैलास बच्छाव यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
