![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसानं झोडपलं! आंबा, काजूसह कांदा पिकाचं नुकसान; अवकाळी पावसाचा शेतीला फटका
IMD Weather Forecast : कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राला पावसानं झोडपलं आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 11 जानेवारीपर्यंत देशासह राज्यातील हवामानावर परिणाम होताना पाहायला मिळणार आहे.
![Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसानं झोडपलं! आंबा, काजूसह कांदा पिकाचं नुकसान; अवकाळी पावसाचा शेतीला फटका Maharashtra Weather update heavy Rain in Konkan Madhya Maharashtra Unseasonal rain Damage to mango cashew and onion crops marathi news Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसानं झोडपलं! आंबा, काजूसह कांदा पिकाचं नुकसान; अवकाळी पावसाचा शेतीला फटका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/3b7b1a2113c040285359d641600e7e2c1696904455352322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Weather Update Today : गेल्या 24 तासांपासून राज्यात विविध भागात पावसाची हजेरी (Rain) पाहायला मिळत आहे. आज आणि उद्या राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राला अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) झोडपलं आहे. मुंबई उपनगरासह ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. नाशिक, अहमदनगर, नंदुरबार जळगाव भागातही हलका पाऊस झाला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 11 जानेवारीपर्यंत देशासह राज्यातील हवामानावर परिणाम होताना पाहायला मिळणार आहे.
पुढील 24 तासात हवामान कसं असेल?
सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. यामुळे आंबा, काजूचे उत्पन्न खराब होऊ शकते. आजही राज्यात या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार, पुढील 24 तासात दक्षिणेकडील किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू आणि केरळच्या अंतर्गत भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याच बरोबर कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडू शकतो.
उत्तर भारतात थंडीची लाट कायम असताना कोकणासह दक्षिण भारतात हवामान खात्याने अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण श्रीलंकेपासून दक्षिण आंध्र प्रदेश किनार्यापर्यंत जात आहे. त्याच वेळी, दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेशात चक्राकार वाऱ्यांचे क्षेत्र तयार झालं आहे. तसेच, यामुळे महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशात आज पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, तामिळनाडू, आंध्र प्रदेशासह दक्षिण भारतात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशासह गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस झाला. दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, वैभववाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आले आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा, काजूचा मोहोर काळा होऊन गळून पडणार तर कीड रोगाचा प्रादुर्भाव होणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत आला आहे.
अवकाळी पुन्हा बरसला; शेतकऱ्याची चिंता वाढली
नाशिक जिल्ह्यातही सोमवारी पावसानं हजेरी लावली. पुन्हा अवकाळी बरसल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी दिसून आली. यामुळे कांदा पिकासह शेतीपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अगोदरच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होता. आता अवकाळीने पावसामुळे पुन्हा शेतीपिकांचं नुकसान होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)