Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप
Buldhana Assembly Election : आपल्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्र्याने आणि भाजपच्या आमदाराने आपल्याला मदत न करता आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी केला.
बुलढाणा : विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अटीतटीची लढाई झाली. त्यात संजय गायकवाड अवघ्या काही मतांनी विजयी ठरले. पण आपलं मताधिक्य कमी होण्यास महायुतीतलेच नेते कारणीभूत असल्याचा आरोप गायकवाडांनी केलाय. संजय गायकवाडांनी नेमकं कुणाला गद्दार ठरवलंय? त्यांचा रोख कुणाकडे होता? पाहूयात या खास रिपोर्टमधून...
पक्षातील विरोधकांनी मिलिंद नार्वेकर आणि अनिल परबांना कॉल केला
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला. आपल्याच पक्षातल्या नेत्यांनी निवडणुकीत गद्दारी केल्याचं गायकवाडांचं म्हणणं आहे. त्यांचा रोख होता तो शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांच्याकडे. माझ्याच पक्षातील प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकरांना फोन करून माझ्या विरुद्ध तुपकर यांच्या ऐवजी जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्याच सांगितलं. भाजपाच्या संजय कुटे यांनी कट रचून अनिल परब यांना संपर्क करून माझ्या विरोधात जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली असा दावा संजय गायकवाडांनी केला.
संजय गायकवाडांनी थेट ठाकरेंच्या शिवसेनेतील मिलिंद नार्वेकर आणि अनिल परबांसारख्या मोठ्या नेत्यांचं नाव घेतल्यानं एकच खळबळ माजली. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून संजय गायकवाड आमदार झाले. संजय गायकवाडांना सर्वाधिक 91 हजार 660 मतं मिळाली. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री शेळकेंना 90 हजार 819 मतं मिळाली. त्यामुळे संजय
गायकवाड अवघ्या 841 मतांनी जिंकले.
काठावरचा विजय संजय गायकडवाडांच्या जिव्हारी
हा अगदी काठावरचा विजय गायकवाडांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यांनी कमी मताधिक्यासाठी शिवसेनेतल्याच नेत्यांना जबाबदार धरलं. आता या सगळ्या प्रकारासंदर्भात आमदार गायकवाड पक्षाकडे लेखी तक्रारही करणार आहेत.
माझ्याच विरोधात महायुती आणि माझ्या पक्षातील नेत्यांनी गद्दारी केली. याची लेखी तक्रार मी करणार आहे असं संजय गायकवाडांनी स्पष्ट केलं. गायकवाडांच्या या आरोपांनंतर शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या.
शिवसेनेतेले फायरब्रँड नेते म्हणून संजय गायकवाडांची ओळख आहे. इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदेंचे ते अत्यंत जवळचे असल्याचं मानलं जातं. त्यामुळे गायकवाडांच्या या गंभीर आरोपांनंतर एकनाथ
शिंदे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
ही बातमी वाचा: