Pusad Assembly Constituency: 72 वर्षांचे अबाधीत वर्चस्व!
>>विनय महाजन, एबीपी माझा प्रतिनिधी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभा निवडणुकांचे निकाल (Vidhan Sabha Election Result 2024) लागले. महायुतीला ऐतिहासिक विजय प्राप्त झाला. राज्यात अनेकांनी विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला. पण याचसोबत चर्चेत राहिला तो यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघ (Pusad Assembly Constituency). त्याचे कारण म्हणजे अजित दादांच्या राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक यांनी विक्रमी मताधिक्याने प्राप्त केलेला विजय. पुसद विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलेले होते. इंद्रनील नाईक दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. तर दुसरीकडे एकेकाळी नाईक घराण्याच्या जवळचे असलेल्या शरद मैंद यांना शरद पवारांनी मैदानात उतरवले, तर कधीकाळी राष्ट्रवादीतच असलेल्या माधवराव वैद्य यांनी यंदा मात्र वंचितच्या तिकीटावरून आपलं नशीब अजमावले. पण शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या या लढतीत इंद्रनील नाईक यांनी तब्बल 91 हजार 832 एवढे मताधिक्य घेत एकतर्फी विजय मिळवला. त्यांचे हेच मताधिक्य राज्यभर चर्चेचा विषय ठरले.
नाईकांचे मताधिक्य आणि चर्चेचा विषय
पुसद विधानसभा मतदारसंघावर गेल्या 72 वर्षांपासून नाईक घराण्याचे अबाधीत वर्चस्व राहिलीले आहे. राज्याचे सर्वाधिककाळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक 1952 ते 1972 या कालावधीत याच मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत. त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी देखील या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत इंद्रनील नाईक पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले आणि त्यावेळी त्यांचा सामना त्यांचेच बंधू असलेल्या भाजपच्या निलय नाईक यांच्या सोबत झाला होता. त्यावेळी इंद्रनील नाईक यांनी 9 हजार 701 मतांची आघीडी घेत विजय मिळवला होता. पण यावेळी राज्यातील बदललेली समीकरणे इंद्रनील नाईकांच्या चांगलीच पथ्यावर पडली आणि नाईक घराण्याच्या इतिहासात कुणालाही मिळाले नाही एवढे विक्रमी मताधिक्य इंद्रनील नाईकांनी घेतले. त्यामुळेच त्यांचे मताधिक्य चर्चेचा विषय ठरले.
नाईकांच्या विजयाची आणि मैंद यांच्या पराभवाची कारणे
राज्यातील बदललेल्या समीकरणांमुळे भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि याच समीकरणाने पुसद विधानसभेतील चित्र बदलले. गेल्या निवडणुकीत इंद्रनील नाईंकाविरुद्ध लढलेले निलय नाईक मात्र यावेळी त्यांच्या सोबत होते. त्यानंतर नाईक घराण्याने दाखवलेली ऐकी महत्वाचा फॅक्टर ठरला असे म्हणावे लागेल. इंद्रनील नाईक यांचे सख्खे बंधू ययाती नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतांचेविभाजन होणार आणि त्याचा नक्कीच फायदा शरद मैंद यांना होणार असे बोलले जाऊ लागले. पण ययाती नाईकांची समजूत काढण्यात आलेले यश, निलय नाईकांची साथ हीच इंद्रनील नाईकांची जमेची बाजू ठरली. त्यामुळे मतविभाजन न होता बंजारा समाजाचे एकगठ्ठा मतदान इंद्रनील नाईकांना झाले.
त्याचसोबत या मतदारसंघात बंजारा समाजाची संख्या लक्षणीय आहे.भाजपने बंजारा समाजाकडे दिलेले विशेष लक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोहरादेवी दौऱ्याचा नक्कीच फायदा या निवडणुकीत नाईकांना झाला. लाडकी बहीण योजना आणि शेतकरी बहूल मतदारसंघ असल्याने वीज माफी सारख्या निर्णयांचा देखील फायदा महायुतीला झाला.नाईकांना जातीय समीकरणं जुळवण्यात आलेलं यश,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साथीमुळे ओबीसी मतदानासोबतच इतर हिंदू मते देखील नाईकांच्याच पारड्यात पडल्याने ऐतिहासीक मताधिक्य घोण्यात इंद्रनील नाईक यांना यश आले.
तर दुसरीकडे सुधाकरराव नाईकांपासून शरद पवारांना साथ देणारे नाईक घराणे यंदा मात्र अजित पवारांसोबत असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न शरद पवारांसमोर होताच. मात्र यावेळी बंजारा उमेदवार न देता मराठा उमेदवार देत मराठा, मुस्लीम आणि दलीत समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला.पण मराठा समाजातील अनेक नगरसेवकांनी आणि नेत्यांनी शरद मैंद यांच्या ऐवजी नाईकांसोबत राहणेच पसंत केल्याने हवे तसे यश पवारांच्या पदरात पडले नाही. त्याचसोबत मतदारसंघात मित्र पक्षाचे नसलेले अस्तित्व, उशीराने जाहीर झालेली उमेदवारी, त्यामुळे सक्रिय राजकारणात नवख्या असलेल्या शरद मैंद यांच्या पुढे अनेक आव्हाने उभी राहिलीआणि त्याचा सामना करण्यात त्यांना अपयश आले.
मतदारसंघातील मुलभूत प्रश्न
मतदारसंघातील अनेक मूलभूत प्रश्न आजही कायम आहे. एकेकाळी विदर्भातील विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुसदमधील कॉलेजची झालेली दुरावस्था, रोजगारासाठी तरुणांना करावे लागत असलेले स्थलांतर, बंद पडलेली सुतगीरणी, वाहतूक नियोजनाच्या अभावाने शहरात होत असलेले अपघात आणि नदी स्वच्छता असे एक नाही अनेक प्रश्न आजही मतदारसंघात कायम आहे. त्याचसोबत पुसद जिल्हा व्हावा आणि रेल्वे सेवा मिळावी या पुसदकरांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबीत असलेल्या मागण्या आहेत. त्यामुळे पुसदकरांनी एवढा भरभरून कौल दिल्यानंतर हे प्रश्न मार्गी लागावे हीच स्थानिकांची अपेक्षा आहे.