मतदारयादीतील घोळ, बोगस मतदान आणि मतदानाची वाढलेली टक्केवारी; काँग्रेसचे तीन आरोप, निवडणूक आयोगाची तीन उत्तरं
Maharashtra : विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी सहा वाजल्यानंतरच्या मतदानाच्या आकडेवारीवर काँग्रेसने शंका उपस्थित केली होती. त्यावर आता निवडणूक आयोगाकडून खुलासा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंबंधी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला भेट देऊन उपस्थित केलेल्या आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आता काँग्रेसला 66 पानी उत्तर दिलं. त्यामध्ये काँग्रेसने केलेले सर्व आरोप निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आले आहेत. राज्यातील मतदारयादीतील घोळ, बोगस मतदार यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला होता. तसेच संध्याकाळनंतर वाढलेल्या मतदानावरही काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगावर आरोपही केले होते.
आरोप क्रमांक 1 - मतदार यादीतून नाव गहाळ आणि नव्यानं सामाविष्ट झालेल्या मतदार यादी संदर्भात
आयोगाचं उत्तर - निवडणूक आयोगाने या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पाळली आहे. मतदार नोंदणी नियम 1960, लोक प्रतिनिधी कायदा 1950, भारतीय संविधान अनुच्छेद 324 अंतर्गत मतदार नोंदणी बाबत निश्चित करण्यात आलेल्या प्रक्रियेचं पालन करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी मतदार यादीचे विशेष उजळणी केली जाते. या संदर्भात सर्व राजकीय पक्षांना माहिती असते. नव्यानं मतदार यादीत नाव नोंदवणे हा नागरिकांच्या वैयक्तिक इच्छेवर आणि सार्वजनिक पारदर्शक प्रक्रियेचा भाग आहे. तसंच मतदार यादीची दरवर्षी उजळणी केली जाते.
साधारणतः 5 जानेवारी दरम्यान मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात बूथ लेव्हल ऑफिसर मार्फत उजळणी पूर्व आढावा घेतला जातो. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये मसुदा यादी प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या जातात. हरकती आणि सूचना निकालात काढल्यानंतर जानेवारी महिन्यात अंतिम यादी प्रसिद्ध केली जाते.
आरोप नंबर 2 - राज्यातील 50 विधानसभा मतदारसंघात जुलै 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान 50 विधानसभा मतदारसंघात नव्यानं सरासरी 50 हजार मतदार वाढवण्यात आले आणि या मतदारसंघापैकी 47 मतदारसंघात महायुती जिंकली.
आयोगाचे उत्तर - 50 मतदारसंघामध्ये 50 हजार मतदार नव्यानं समाविष्ट केले हा आरोप वस्तुस्थितीला धरून नाही. प्रत्यक्षात फक्त 6 विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीनंतर 50 हजाराहून अधिक मतदारांची नव्यानं कायदेशीर प्रक्रिया पाळून नोंदणी झाली.
महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीची उजळणी प्रक्रिया सुरू असताना सूचना आणि हरकती नोंदवण्याच्या प्रक्रियेत काँग्रेस पक्षाच्या स्थानिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
लोकसभा निवडणूकीनंतर किती मतदार नोंदणी नव्यानं झाली?
एकूण 48 लाख 81 हजार 620 मतदारांची नव्यानं नोंदणी झाली. मूळच्या यादीतील 8 लाख 391 मतदारांची नावं वगळण्यात आली. त्यामुळं एकूण 40 लाख 81 हजार 229 मतदार लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणुकीदरम्यान नव्यानं सामाविष्ठ करण्यात आले.
लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातील मतदार संख्या
9 कोटी 29 लाख 43 हजार 890
विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील मतदारसंख्या..
9 कोटी 70 लाख 25 हजार 119
नव्यानं नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या
40 लाख 81 हजार 229 मतदारांध्ये...
8 लाख 72 हजार 094 मतदार हे 18 ते 19 वयोगटातील.
17 लाख 74 हजार 514 मतदार हे 20 ते 29 वयोगटातील.
हा युवकांचा लोकशाही प्रक्रियेतील वाढता सहभाग दर्शवतो.
आरोप क्रमांक 3 - मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीबाबत.
आयोगाचं उत्तर - मतदान टक्केवारीमध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ अथवा विसंगती नाही. संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी अंतिम टक्केवारी नसते. फॉर्म 17 ए ची पडताळणी केल्यानंतर योग्य आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीकडे फॉर्म 17 सी असतो.
मतमोजणीपूर्वी फॉर्म 17 सी मधील आकडेवारी इव्हीएमच्या आकडेवारी सोबत जुळवली जाते. ही प्रक्रिया उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जाते. निवडणूक आयोगाने काँग्रेस प्रतिनिधी मंडळाने 29 नोव्हेंबरला उपस्थित केलेल्या सर्व आरोपांचे स्पष्टीकरण केले आहे.