सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Saif Ali khan Attack Case: सैफवर हल्ल्याप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या आकाश कनौजियाच्या आई वडिलांनी आपली व्यथा एबीपी माझाकडे व्यक्त केली.
मुंबई : अभनेता सैफअली खानवरील (Saif ali khan) हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या चुकीच्या कारवाईमुळे आकाश कनौजिया या युवकाचे आयुष्य उध्वस्त झाले असून कुटुंबीयांवरही मोठा आघात झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी केवळ संशयित म्हणून आकाशला ताब्यात घेतल्याने सर्वत्र त्याची व त्याच्या कुटुंबीयांची बदनामी झाली. याशिवाय त्याचं जमलेलं लग्नही मोडल्याची ह्रदयस्पर्शी कहाणी आकाशच्या आई-वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली. दरम्यान, सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी खऱ्या आरोपीला अटक केली असून शहजाद असं त्याचं नाव आहे. या चोरी व हल्ल्याच्या घटनेतील खरा आरोपी हा बांगलादेशी नागरिक असून तो पैसे चोरण्याच्या उद्देशानेच सैफच्या घरी आल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. मात्र, एका सेलिब्रिटीवरील हल्ल्याच्या आरोपीचा शोध घेताना पोलिसांकडून झालेली चूक एका सर्वसामान्य निष्पाप कुटुंबीयांच्या आयुष्यात मोठं दु:ख घेऊन आल्याचं दिसून येत आहे.
सैफवर हल्ल्याप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या आकाश कनौजियाच्या आई वडिलांनी आपली व्यथा एबीपी माझाकडे व्यक्त केली. केवळ एका आरोपामुळे आयुष्य कसं बदललं, किती मोठा आघात कुटुंबीयांवर झाला हे आई वडिलांनी सांगितलं. आकाश कनौजिया असं या तरुणाचं नाव असून तो मुंबईत नोकरी करत होता. मात्र, सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी त्याला छत्तीसगडमधील दुर्ग स्टेशनवरून संशयीत म्हणून 18 जानेवारीला ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, पोलिसांकडून 19 तारखेला मुख्य आरोपी म्हणून शहजादला अटक करण्यात आली. त्यानंतर, आकाशला सोडून देण्यात आलं होतं. मात्र, या सगळ्या घटनेमुळे आकाशची ड्रायव्हर म्हणून असलेली नोकरी गेली, लग्नाच्या बोलणी सुरू होत्या त्याही मोडल्या, कुटुंबाची मोठी बदनामी झाली. एकूणच आमच्या मुलाच्या आयुष्याबरोबरच आमचं कुटुंब उध्वस्त झाल्याची प्रतिक्रिया आई वडिलांनी जड अंत:करणाने व्यक्त केली आहे.
पोलिसांना मिशी दिसली नाही का?
पोलिसांनी सीटीटीव्ही फुटेजमधील आरोपीचा फोटो व त्याच्या खांद्यावरील बॅग पाहून आरोपीचा शोध सुरू केला. त्यावेळी, माझ्या मुलाकडेही तशीच बॅग असल्याने माझ्या मुलाला रायपूरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, सीसीटीव्हीतील आरोपीला मिशी नव्हती, माझ्या मुलाला मिशी होती हा साधा फरकही पोलिसांना लक्षात आला नाही. पण, यामुळे आमचं कुटुंब उध्वस्त झाल्याचं आकाशच्या आईने म्हटलं आहे.
आकाशच्या वडिलांनी सांगितली आपबिती
आकाशचे वडील कैलास कनौजिया म्हणाले की, मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे आमच कुटुंब बरबाद झालं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा मुलगा आणि माझा मुलगा त्यांनी नीट पाहिला नाही. सैफवर हल्ला करणारा संशयित म्हणून मीडियाने फोटो काढले आणि आमच्या कुटुंबाला धक्का बसला. सैफवर हल्ला झाला तेव्हा आकाशला मुंबई पोलिसांचा फोन आला, त्यांनी विचारलं की तू कुठे आहेस? मुलाने मी सांगितलं मी माझ्या घरी आहे. त्यानंतर दुर्गमधून त्यांनी त्याला ताब्यात घेतलं, त्यावेळी त्याला रायपूरला नेण्यात आलं. रायपूरहून मुंबईला आणण्यात आलं. मुंबई पोलिसांनी त्याला मारहाण केली. मुलाची सुटका झाल्यानंतर तो घरी आला तेव्हा आमच्या आयुष्यात खळबळ माजली होती. कारण, मुलाला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. तसेच त्याच जमलेलं लग्नही मोडलं आहे. त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबाने आकाशची बातमी टीव्ही चॅनेलवर पाहिली. त्यामुळे आजीला सांगण्यात आले आपली लग्नाची बोलणी थांबूया, अशी पीडित आपबिती आकाशचे वडिल कैलास यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली. दरम्यान, कनोजिया कुटुंब हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून टिटवाळा येथे राहत असून आकाशचे वडिल दुचाकीच्या गॅरेजचा व्यवसाय करतात.
हेही वाचा
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!