Sharad Pawar : मागच्या सरकारचा वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तम होता, पण....पाहा काय म्हणाले शरद पवार
वाईन विक्रीचं धोरण मागील राज्य सरकारनं आणलं होतं. हा उत्तम निर्णय होता. पण काही कारणास्तव तो अंमलात आला नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

Sharad Pawar : प्रत्येक फळांची संघटना आपण केली. मात्र, द्राक्ष संघाने (Grape Association) जे काम केलं ते देशात कोणत्याच संघाने काम केल्याचं मी पाहिलं नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. आज आपण दोन वर्षानंतर भेटतोय. या दरम्यान अनेक संकटं आली. यात द्राक्ष बागायतदारांना मोठी किंमत मोजावी लागली. गेली दोन वर्षे द्राक्ष निर्यातीला (Grapes Export) बंदी आली. अशात चीनने निर्यातीच्या नियमात अटी टाकल्या. त्यानंतर ज्या मर्यादा आल्या, त्यामुळं द्राक्ष शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचे शरद पवार म्हणाले. मागील राज्य सरकारनं आणलेलं वाईन विक्रीचं धोरण हा उत्तम निर्णय होता असेही पवार म्हणाले.
द्राक्ष संघाची 1907 साली स्थापना झाली होती. बारामती आणि फलटण भागातील एक शेतकरी होते. त्यांनी शास्त्रशुद्ध दृष्टिकोन ठेवत पुढाकार घेत, द्राक्ष बागायतदार संघाची स्थापना केल्याचे पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये द्राक्ष परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. 35 हजारांहून अधिकचे शेतकरी या संघटनेत लक्ष घालतात. त्यामुळेच आता ही शेती मर्यादित भागापूरती मार्यदित राहिलेली नाही. ती राज्याच्या विविध भागात विस्तारलेली असल्याचे पवार म्हणाले.
स्थानिक बाजारपेठेत मजबूत होण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी बोलणार
देशातून 8 टक्के द्राक्षाची निर्यात होते, तर 92 टक्के द्राक्षाची भारतीय बाजारपेठेत विक्री केली जाते. त्यामुळं स्थानिक बाजारपेठेत कशी मजबूत होईल, आर्थिक उलाढाल मोठी होईल याकडं लक्ष द्यायला हवं. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी आपण बोलणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितलं. प्रश्न खूप आहेत. यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पवार म्हणाले. जाणकार, कष्टकरी, विज्ञानाचा स्वीकार करणारा शेतकरी म्हणून द्राक्ष बागायतदारांची ओळख आहे. ती अबाधित राहील असंच काम तुम्ही कराल असेही पवार म्हणाले.
लोकसंख्या वाढत असताना शेतीवर किती बोजा टाकायचा याचा विचार करायला हवा
दरम्यान, वाईन विक्रीचं धोरण मागील राज्य सरकारनं आणलं होतं. हा उत्तम निर्णय होता. पण काही कारणास्तव तो अंमलात आला नसल्याचे शरद पवार म्हणाले. दरम्यान, आजही देशातील 60 टक्के जनता शेती करते. जगाची आणि देशाची लोकसंख्या पाहता, शेतकऱ्यांचा आकडा दुर्लक्ष करुन चालणार नाही. लोकसंख्या वाढत असताना शेतीवर बोजा किती टाकायचा याचाही विचार केला पाहिजे असेही पवार म्हणाले. शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आम्हाला अस्वस्थ करतो. अर्थकारण जर व्यवस्थित राहिलं नाही तर कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो. ही परिस्थिती येऊ नये याबाबतचा आपण एकत्रितपणे विचार करायला हवा असे शरद पवार यांनी सांगितले.
शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे घटक हे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. शेतीचा ते भाग आहेत. त्यांच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून शेती सुरु आहे, असे देशात जवळपास 5 हजार शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्यामुळं विज्ञान आणि शेतीचा समतोल राखला गेल्याचे पवारांनी सांगितले. दरम्यान, प्रत्येक फळांची आपण संघटना केली. मात्र, द्राक्ष संघाने जे काम केलं ते देशात कोणत्याच संघाने केल्याचं मी पाहिलं नसल्याचं पवारांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
