साडेसहा सेमी लांबी, जास्त गोडी, द्राक्षाच्या नव्या जातीला VSD Seedless नावाने पेटंट; सांगलीतील शेतकऱ्याच्या प्रयत्नांना यश
द्राक्षबागातदार विजय शंकर देसाई यांनी काही वर्षांपूर्वी शोध लावलेल्या द्राक्षाच्या नव्या जातीला VSD Seedless या नावाने पेटंट मिळाले आहे. जास्त रोगप्रतिकारक क्षमता, जास्त गोडी, कमी खर्चात जास्त उत्पादन, मोठी पाने आणि मण्यांची विक्रमी साडे सहा सेमी लांबी ही या द्राक्षाच्या जातीची वैशिष्ट्ये आहेत.
Sangli Grapse Petent : तासगाव (Tasgaon) तालुक्यातील वडगावच्या विजय देसाई या द्राक्षबागायतदार शेतकऱ्याने साडे सहा सेमी मण्याची लांबी असलेल्या द्राक्षाच्या (Grapes) नव्या जातीचा शोध लावला होता. आता द्राक्षाच्या या नव्या जातीला भारत सरकारकडून व्हीएसडी सीडलेसचे (VSD Seedless) पेटंट मिळाले आहे. 14 जुलै 2020 रोजी विजय देसाई यांनी पेटंटसाठी अर्ज दाखल केला होता. जास्त रोगप्रतिकारक क्षमता, जास्त गोडी, कमी खर्चात जास्त उत्पादन, मोठी पाने आणि मण्यांची विक्रमी साडे सहा सेमी लांबी ही या द्राक्षाच्या जातीची वैशिट्ये आहेत. एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानेच स्वत:च्या अनुभवातून शोधून काढलेल्या या द्राक्षाच्या नवीन वाणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आणखी एक द्राक्षाचे वाण लागवड करण्यास मिळणार आहे. विजय देसाई यांनी आता या जातीच्या रोपांच्या काड्या तयार करुन ठेवल्या आहेत. जेणेकरुन आणखी शेतकरी हे द्राक्षाचे वाण लागवड करतील असा देसाई यांचा प्रयत्न आहे.
सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील वडगाव येथील विजय शंकर देसाई या द्राक्षबागातदार शेतकऱ्याने काही वर्षांपूर्वी द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध लावला. जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांमध्ये या द्राक्षाची बरीच चर्चा देखील झाली. आता मात्र या द्राक्षाच्या जातीला VSD Seedless या नावाने पेटंट मिळाले आहे. विजय देसाई यांची मूळची चार एकर जमीन. माळरानावरल्या जमिनीत सुपर जातीची द्राक्षबाग होती. आठ वर्षांपूर्वी त्याच बागेत एका झाडावर त्यांना वेगळ्या पद्धतीचा द्राक्षघड दिसला. त्यांनी त्या झाडाच्या काड्या काढून काही नवीन लागण केलेल्या बॅग्स भरल्या. त्याचा माल बांगलादेश आणि मुंबईच्या मार्केटला पाठवला. या द्राक्षच्या मालास व्यापाऱ्यांनी सगळ्यांपेक्षा जास्तीचा दर दिला.
दरवर्षी देसाई यांनी या झाडांच्या काड्या काढून क्षेत्र वाढवलं. सध्या त्यांच्याकडे 13 एकर द्राक्षबाग आहे. त्यात पावणेदोन एकर क्षेत्रावर या नवीन वाणाची द्राक्षे आहेत. गेली आठ वर्षे प्रयोग करुन त्यांनी हे क्षेत्र वाढवले आहे. मागील काही वर्षात 501 रुपयांनी देसाई यांचा माल व्यापाऱ्यांनी घेतला. द्राक्षाला दर नसलेल्या काळात देखील या द्राक्षाच्या चार किलोच्या पेटीला 451 रुपये दर आला होता. आता या जातीच्या द्राक्षाच्या रोपांची देसाई यांनी निर्मिती केली असून शेतकऱ्यांनी द्राक्षाचे हे वाण लावून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवावे, असे आवाहन देसाई यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना केलं आहे.