Majha Katta : पहिल्या पाच वर्षातच सह्याद्री द्राक्ष निर्यातीत पोहोचली एक नंबरवर : विलास शिंदे
2010 ला सह्याद्रीची सुरुवात झाली. पुढच्या पाच वर्षाच्या काळात सह्याद्री फार्म द्राक्ष निर्यातीत एक नंबरवर पोहोचल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले.
Majha Katta : 2010 ला सह्याद्रीची सुरुवात करताना ठरवले होते की, पुढच्या पाच वर्षात द्राक्ष निर्यातीत वरच्या स्तरावर जायचे आहे. त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, सभासदांमध्ये असणारा विश्वास, निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता, दर्जावर काम करण्याचे ठरवले होते. सुरुवातीला मोठ्या शेतकऱ्यापासून दूर राहणे छोट्या शेतकऱ्यांसाठी काम करण्याचे ठरवले होते. त्यानुसार पुढच्या पाच वर्षातच म्हणजे 2015 ला सह्याद्री निर्यातीत नंबर एकला पोहोचल्याचे कृषी उद्योजक आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे यांनी सांगितले. आज सह्याद्रीत देशातील सर्वात मोठे पॅक हाऊस आहे. आता एका जागेवर दिवसाला 18 ते 20 कंटेनर द्राक्षांची पॅक होतात. सुरुवातीपासूनच व्हिजन मोठे ठेवले होते असे त्यांनी सांगितले. विलास शिंदे हे 'माझा कट्ट्यावर' उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
12 वर्षात 42 देशात सह्याद्रीचा ब्रॅन्ड पोहोचवला. द्राक्ष, केळी आणि डाळिंब ही फळे आता 42 देशांमध्ये जात आहेत. तसेच पक्रिया केलेल्या वस्तू देखील या 42 देशांमध्ये जात असल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. जे करायचे ते दर्जेदार करायचे असे आम्ही सुरुवातीपासूनच ठरवले होते. तसेच सह्याद्री फार्मच्या माध्यमातून आम्ही ट्रेनिंग सेंटर देखील सुरु केले आहे. त्यामाध्यमातून आम्ही ग्रामीण भागात कोणकोणत्या शेतीत संधी आहे. त्यासाठी लागणारे बेसिक स्कील देण्याचे काम आम्ही करत असल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य जपणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. तसेच पाणी किती प्रमाणात देणे यावर देखील शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे विलास शिंदे यांनी सांगितले.
कोरोनाचा काळ आणि सह्याद्री
खरतर कोरोनाचा काळा हा खूप आव्हानात्मक होता. अचानक आलेल्या स्थितीमुळे निर्यातीत खूप अडचणी निर्माण झाल्या. जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळी एकाच दिवसात सगळे ऑपरेशन बंद झाले. साडेतीन हजार कर्मचारी सह्याद्रीमध्ये काम करत होते. दुसऱ्या दिवशी कोणीच नव्हते. मार्च, एप्रिल हा द्राक्ष उतरणीचा महत्त्वाचा काळ असतो. या काळातच असा प्रसंग आल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर पुढच्या चारच दिवसामध्ये आम्ही यंत्रणा सुरु केली. कर्मचारी कमी झाले पण काम सुरु राहिले. 80 लोक पॅकिंग हाऊसमध्ये होते. या काळात नुकसानीला तोंड देण्याची वेळ आली. युरोपमध्ये द्राक्ष गेल्यावर तिकडे लॉकडाऊन झाले. 18 युरोने विकणारे द्राक्ष पाच ते सहा युरोवर आले, त्याचा मोठा फटका बसल्याचे शिंदे यांनी सांगितले.