गावी पोहोचण्यासाठी वडिलांच्या निधनाचा बनाव, पुण्याहून परभणीत आलेल्या तिघांवर कारवाई
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या तिघांनी वडिलांचं निधन झाल्याचं सांगून पुण्याहून परभणी गाठली. मात्र पोलिसांनी चौकशी केली असता तिघेही खोटं बोलत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी तिघांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला.
![गावी पोहोचण्यासाठी वडिलांच्या निधनाचा बनाव, पुण्याहून परभणीत आलेल्या तिघांवर कारवाई False death of father for travel to village, action taken against three people गावी पोहोचण्यासाठी वडिलांच्या निधनाचा बनाव, पुण्याहून परभणीत आलेल्या तिघांवर कारवाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/14050430/WhatsApp-Image-2020-04-12-at-11.40.52-PM-3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परभणी : देशात लॉकडाऊनचा आजचा 20 वा दिवस आहे. तरीही अनेकजण घरापासून दूर ठिकठिकाणी अडकले आहेत. प्रत्येकाला घरी जायचं आहे, मात्र राज्यांच्या, जिल्ह्यांच्या सीमा सील केल्याने या सर्वांना आपल्या मुळगावी जाता येत नाही. त्यामुळे अनेकजण वेगवेगळी शक्कल लढवून घरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. परभणीतील एकाने वडिलांचे निधन झाल्याचं सांगत पुण्याहून गाव गाठलं. मात्र सदर व्यक्ती खोटं बोलल्याचं पोलिसांच्या चौकशीनंतर लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत बाहेर पडता येत नसल्याने आपल्या गावी पोहोचण्यासाठी सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथील आकाश रणदिवे, वैजनाथ रणदिवे, रेखा वैजनाथ रणदिवे या तिघांना एक आयडिया केली. चक्क वडिलांचे निधन झाल्याचे सांगून पुण्याहून गाव गाठलं.
मात्र सोनपेठ पोलिसांनी या तिघांना अडवून त्यांची चौकशी केली आणि थेट गावापर्यंत जाऊन माहिती घेतली. मात्र पोलिसांनी गावात जाऊन चौकशी केल्यानंतर या तिघांचा खोटेपणा उघड पडला. त्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कामाधंद्यासाठी गाव सोडून शहरात गेलेले अनेकजण लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकले आहे. काहींनी शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपलं गाव गाठलंय. काहींनी टँकरमधून लपून, तर काहींना भाजीपाल्याच्या गाडीत लपून मिळेत त्या वाहनात बसून गाव गाठण्याचा प्रयत्न केला. 21 दिवसांचं लॉकडाऊन उद्या संपतंय, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने घरापासून दूर अडकलेल्या अनेकांची चिंता वाढलीय. त्यामुळे गावाकडं नाय जायचं तर दोन वेळचं पोट कसं भरायचं असाही अनेकांचा प्रश्न पडलाय.
संबंधित बातम्या- महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
- भारतातला कोरोना विषाणू वेगळा? 'या' राज्याने केली संशोधनाची मागणी
- Coronavirus | देशातील लॉकडाऊन वाढणार? पंतप्रधान मोदी उद्या देशाला संबोधित करणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)