Delhi CM : भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने 15 आमदारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी 9 नावे निवडण्यात आली आहेत. या 9 नावांपैकी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि सभापती यांची नावे निश्चित केली जाणार आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्ता यांचे नाव निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएसएसने त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, जो भाजपने स्वीकारला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज सायंकाळी 7 वाजता भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी (20 फेब्रुवारी) रामलीला मैदानावर दुपारी 12.35 वाजता होणार आहे. दिल्लीच्या मुख्य सचिवांनी पाठवलेल्या निमंत्रणात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या शपथविधीचाही उल्लेख आहे.
आरएसएसचा महिला मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव भाजपने मान्य केला
RSS ने दिल्लीत एका महिलेला मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. संघाने रेखा गुप्ता यांचे नाव पुढे केले असून ते भाजपने मान्य केले आहे. रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 6 नावे
भाजपने आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने नेहमीच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सर्व राजकीय अंदाज बाजूला ठेऊन पक्ष संघटनेच्या जुन्या चेहऱ्यांकडे राज्याची कमान सोपवत आहे. असे असतानाही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 6 आमदारांची नावे आघाडीवर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने 15 आमदारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी 9 नावे निवडण्यात आली आहेत. या 9 नावांपैकी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि सभापती यांची नावे निश्चित केली जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप दलित, पूर्वांचल आणि जाट यांची जुळवाजुळव करू शकते. दोन उपमुख्यमंत्री असू शकतात. कार्यक्रमाला 30 हजार पाहुणे येण्याची शक्यता आहे. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री निवडून आलेल्या आमदारांमधूनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांच्या नावांचीही घोषणा होऊ शकते.
या सोहळ्याला पीएम मोदींसह अनेक दिग्गज उपस्थित राहणार
या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व केंद्रीय मंत्री, भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उद्योगपती, सिनेतारक, क्रिकेटपटू, संत, मुत्सद्दीही येणार आहेत. दिल्लीतूनही 12 ते 16 हजार लोकांना बोलावण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाल्या, केजरीवाल घरी बसून शपथविधी पाहतील
केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या की, सिद्धरामय्यांप्रमाणेच अरविंद केजरीवालही केंद्र सरकारवर आरोप करायचे, आता त्यांनाही जनतेने धडा शिकवला आहे. डबल इंजिन सरकार दिल्लीची परिस्थिती सुधारेल कारण देशच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. मुख्यमंत्री कोणीही असो, मुख्यमंत्री भाजपचाच होणार याचा मला आनंद आहे. अरविंद केजरीवाल यांनी आता घरी बसून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पाहावा.
इतर महत्वाच्या बातम्या
























