Shahu Maharaj : अवघं कोल्हापूर आज 100 सेकंदासाठी स्तब्ध होणार; लोकराजा शाहू महाराजांना कोल्हापूरकर वाहणार अनोखी आदरांजली
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची आज 100 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने कोल्हापुरात सकाळी 10 वाजता 100 सेकंदासाठी स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात येणार आहे.

कोल्हापूर: आपल्या महान कार्याने कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज 100 वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने कोल्हापूरकरांकडून शाहूराजांना अनोखी आदरांजली वाहण्यात येणार आहे. आज सकाळी 10 वाजता कोल्हापूर 100 सेकंदासाठी स्तब्धता पाळणार आहे.
मुंबई येथील पन्हाळा लॉज या ठिकाणी 6 मे 1922 या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले. त्या दिवसाला आज 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संपूर्ण कोल्हापूर 100 सेकंदासाठी स्तब्ध ठेवून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. ही स्तब्धता म्हणजे आपल्या आवडत्या राजाला, रयतेच्या राजाला, शाहू महाराजांना त्यांच्या 100व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन असणार आहे.
शाहू महाराजांना वाहण्यात येणारी ही आदरांजली सकाळी 10 वाजता असणार आहे. त्यानिमित्ताने कोल्हापुरातील सर्व व्यवहार 100 सेकंदासाठी थांबवण्यात येणार आहेत. या वंदन कार्यक्रमात केवळ शहरच नव्हे तर जिल्ह्यातील, राज्यातील, परदेशातील ज्यांना शाहू महाराजांची थोरवी माहिती आहे ते कोणीही त्यांच्यासाठी स्तब्ध राहून सहभागी होऊ शकणार आहेत. या निमित्ताने राजर्षी शाहू महाराजांनी रयतेसाठी, समाजासाठी आणि देशासाठी काय योगदान दिलं आहे, काय कार्य केलं आहे त्याचं स्मरण केलं जाणार आहे.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापुरात आज दसरा चौक ते शाहू महाराज समाधी स्थळ इथपर्यंत कॅन्डल मार्च काढत लोक राजाला आदरांजली वाहिली. या कँडल मार्चमध्ये पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. 6 मे रोजी म्हणजे शुक्रवारी सकाळी 10 वाजता 100 सेकंद उभे राहून लोक राजाला आदरांजली वाहूया असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.
महत्त्वाच्या बातम्या:
- PHOTO : कोल्हापुरात कृतज्ञता पर्व, शाहू महाराज यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन
- Shahu Maharaj : शिवरायांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी शाहू महाराजांचे प्रयत्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- ज्यांना फुले, आंबेडकर यांचं नाव का घेतो असा प्रश्न पडतो त्यांना महाराष्ट्र समजला नाही; शरद पवारांचा राज ठाकरे यांना टोला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
