Shahu Maharaj : शिवरायांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी शाहू महाराजांचे प्रयत्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. तर राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे निमित्त साधत प्रतिक जयंतराव पाटील यांनी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे महत्वपूर्ण मागणी केली आहे.

मुंबई : सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. तसेच राजर्षी शाहूंच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहूंनी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले असं मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, "लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा आग्रह धरला. अनेक अनिष्ट चालीरीती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य अशा सामान्यांच्या जीवनाशी निगडित क्षेत्रात दूरगामी अशी धोरणे राबविली. त्यांनी कृषी, सहकार, उद्योग या क्षेत्रांच्या विकासासाठी दूरदृष्टीने प्रकल्प, योजना राबविल्या. त्याद्वारेही सामाजिक अभिसरण होईल असे नियोजन केले. त्यांच्या या द्रष्ट्यापणाची फळे आज आपण चाखतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहूंनी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले. ते सामाजिक न्यायाचे अग्रदूत आहेत. त्यांच्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम. सर्वांना सामाजिक न्याय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन."
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे निमित्त साधत प्रतिक जयंतराव पाटील यांची महत्वपूर्ण मागणी
महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, विचार व कार्याचा शालेय शिक्षण अभ्यासक्रमात सविस्तर समावेश करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन प्रतिक जयंतराव पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधत प्रतिक जयंतराव पाटील ही महत्वपूर्ण मागणी केली आहे.
बालभारतीची इतिहास विषयाची सहावी ते दहावी इयत्तांची पुस्तके पाहण्यात आली. या सर्व अभ्यासक्रमांची मागील काही वर्षांत पुनर्रचना झाल्याचेही समजले. महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या युगप्रवर्तक कार्याची आपल्याला जाणीव आहेच. या तीनही महापुरुषांच्या विचारांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण आधुनिक भारताची जडणघडण केली आहे. सध्या या तीनही महापुरुषांच्या कार्याचा बालभारतीच्या नवीन पुस्तकात असलेला उल्लेख काहीसा अपुरा व मोजक्या शब्दात केला आहे असे प्रतिक पाटील यांनी म्हटले आहे.
सहावी ते दहावीच्या सर्व पुस्तकांचे अवलोकन केले असता वेगवेगळ्या ठिकाणी या महापुरुषांचा प्रासंगिक उल्लेख असला तरी त्यांच्या संपूर्ण जीवन, विचार व कार्याची सविस्तर माहिती असलेला संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम गरजेचा आहे. जेणेकरुन आधुनिक भारताचा पाया असलेल्या या तीनही महापुरुषांच्या कार्याची सविस्तर माहिती नव्या पिढीला होईल. आठवी ते दहावी कोणत्याही एका वर्षाचा इतिहासाचा संपूर्ण अभ्यासक्रमात केवळ महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या जीवन, विचार व कार्यावर असायला हवा असेही प्रतिक पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
माझ्या या मताचा गांभीर्याने विचार करून त्यावर आपण सकारात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा प्रतिक जयंतराव पाटील यांनी व्यक्त करतानाच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना जयंतीदिनी हीच खरी आदरांजली ठरेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
