ज्यांना फुले, आंबेडकर यांचं नाव का घेतो असा प्रश्न पडतो त्यांना महाराष्ट्र समजला नाही; शरद पवारांचा राज ठाकरे यांना टोला
Sharad Pawar : देश अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असताना कोल्हापूरने मात्र वेगळा आदर्श निर्माण केला आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूर: शिवाजी महाराज हे आपल्या अंत:करणात आहेत. पण फुले-शाहू-आंबेडकरांनी देशाला नवी दिशा देण्याचं काम केलं. ज्यांना फुले, आंबेडकर यांचं आपण का नाव घेतो असा प्रश्न पडतो त्यांना महाराष्ट्र समजला नाही अशी शेलकी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंवर केली आहे. राष्ट्रवादीची संकल्प सभा आज कोल्हापुरात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, "काहीनी संघटना काढली, त्या माध्यमातून माझ्यावर टीका केली. त्यांनी माझ्यावर टीका केली की तुम्ही शिवाजी महाराज यांचं नाव का घेत नाही. शिवाजी महाराजांचं नाव आपल्या अंत:करणात आहे. अनेक राजे होऊन गेले. पण 300- 400 वर्षानंतर केवळ शिवाजी महाराज यांचे नाव येतं. आंबेडकर यांच्याबाबत अनेकांना माहिती नाही की वीज आणि जलसंधारण खात्याचे मंत्री होते. अनेक महत्त्वाचे निर्णय त्यावेळी आंबेडकर यांनी घेतले होते. देश पुढे न्यायचा असा असेल तिथं वीज नेली पाहिजे त्यासाठी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन त्यांनी सुरू केलं होतं. देशाला नवीन दिशा देण्याचं काम आंबेडकर यांनी केलं होतं. ज्यांना फुले, आंबेडकर यांचं का नाव घेता असा प्रश्न पडतो त्यांना महाराष्ट्र समजला नाही."
शरद पवार म्हणाले की, "आज हा देश एकसंघ ठेवण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. 2014 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं. त्यावेळी या देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न झाले होते. परंतु निवडणुकीत लोकांचा कल भाजपला मिळाला. समाजातील सर्व घटक एका विचाराने कसे राहतील ही जबाबदारी सरकारची आहे. पण आज वेगळी परिस्थिती दिसतेय. देशाच्या राजधानीत हल्ले होत आहे, जाळपोळ होत आहे. त्या ठिकाणचं गृहखातं हे केंद्राच्या हातात आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे आणि तरीदेखील त्यांना दिल्ली सांभाळता येत नाही. मी कर्नाटकमध्ये होतो तिथं अल्पसंख्याक लोकांबाबत जाहीर बोर्ड लावण्यात आले आहेत. अल्पसंख्याक जातीची दुकानात जाऊ नये अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात आले आहेत."
देश अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असताना कोल्हापूरने मात्र वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जो उमेदवार तिन्ही पक्षांनी दिला त्याला भरघोस पाठिंबा तिन्ही पक्षांनी दिला. निवडणुकीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे असं शरद पवार म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, "चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं होतं की निवडणुकीत हरलो तर हिमालयात जाईल. पण तुम्ही कोल्हापूरकर हुशार आहात तुम्ही त्यांचा बंदोबस्त केलात. ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी माझी काळजी वाढली. मग जयंत पाटलांना बोललो तर ते बोलले मी जातो त्यांच्याबरोबर. मी म्हटलं तुम्ही कशाला जाता तर ते बोलले, खरंच ते नेमके कुठे जातायत ते पाहतो."
शरद पवार पुढे म्हणाले की, "सत्ता येते आणि जाते देखील. सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नसते. त्याचा गैरवापर करायचा नसतो. दोन वर्षांपूर्वी कुणाला ईडी माहिती नव्हती. परंतु विरोधकांवर दबाव आणण्यासाठी त्याचा वापर केला जातो. राष्ट्रवादीचे दोन मंत्री जेल मध्ये आहेत. सुरुवातीला अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये घोटाळा केला असा आरोप होता. त्यानंतर 50 कोटी आणि आता 1 कोटी रुपये घोटाळा केला असा आरोप आहे. नवाब मलिक यांच्यावर आरोप आहे, 20 वर्षांपूर्वी त्यांनी एक जमीन घेतली. एवढ्या वर्षात दिसली नाही आता त्यांना अटक केली आहे."
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
