Agriculture News : पावसाचा लहरीपणा, त्यात मोझॅकचा प्रादुर्भाव; सोयाबीन पिकाच्या उत्पादनात निम्म्याने घट
soybean crop : उशिरा आलेला पाऊस, त्यातच ऑगस्ट महिन्यात पडलेला पावसाचा खंड अशा अनेक कारणांनी सोयाबीनच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
हिंगोली : कापूस (Cotton) आणि सोयाबीन (soybean) हे दोन्ही पीक मराठवाड्यात (Marathwada) प्रामुख्याने घेतले जातात. अशातच राज्यात सोयाबीनला शेतकरी आता प्रमुख पीक म्हणून बघू लागले आहेत. महाराष्ट्रात यावर्षी 50 लाख 85 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. तर, मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड झाली आहे. दरम्यान, शेतामधील सोयाबीनच्या पिकाची आता काढणी सुरू आहे. परंतु, उशिरा आलेला पाऊस, त्यातच ऑगस्ट महिन्यात पडलेला पावसाचा खंड अशा अनेक कारणांनी सोयाबीनच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर, याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसतांना पाहायला मिळत आहे.
कमी खर्च आणि महाराष्ट्राच्या वातावरणाला अनुकूल असं पीक म्हणून सोयाबीनच्या पिकाकडे महाराष्ट्रातील शेतकरी बघू लागले आहेत. यावर्षी महाराष्ट्रात 50 लाख 85 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र, यंदा सुरवातीलाच पाऊस एक महिना उशिराने आला. त्यातच मधातच पावसाचा लहरीपणा पाहायला मिळाला. त्यामुळे, याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनच्या वाढीवर झाला होता. अनेक ठिकाणचे सोयाबीनचे झाड वाढलीच नव्हती. त्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. अनेकांनी आपल्याकडे असलेल्या पाणीसाठ्याच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा विशेष परिणाम सोयाबीनच्या पिकावर झाला नाही. यात कमी म्हणून की काय त्यानंतर येलो मोझॅक नावाचा बुरशीजन्य रोग सोयाबीनवर पडला. त्यामुळे सुद्धा सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. पावसाचा लहरीपणा आणि येलो मोझॅकचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन निम्म्याने घटल्याचं शेतकरी सांगत आहेत.
पीक विमा तत्काळ मंजूर करण्याची मागणी...
एकट्या हिंगोली जिल्ह्यांमध्ये अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सोयाबीनची लागवड केलेले सर्व शेतकरी आता हैराण झाले आहेत. तोंडावर आलेला दसरा दिवाळी सण कसा साजरा करायचा हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे. यात सोयाबीनच्या उत्पादनावर रब्बीच्या पेरणीचं सुद्धा नियोजन केलं जातं. त्यामुळे, आता पेरणी कशी करायची ही समस्या सुद्धा शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ पिक विमा मंजूर करावा अशी मागणी शेतकरी करत आहे.
सोयाबीनवर मोझॅकचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात
सोयाबीन पिकावर यंदा येलो मोझॅकचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पडलेल्या रोगामुळे नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. यावर्षी सुरुवातील उशिरा पाऊस झाला. त्यामुळे पेरण्या लांबल्या होत्या. त्यानंतर सोयाबीन पिकावर गोगलगायींचे संकट आले. हे संकट संपत नाही, तोच पुन्हा येलो मोझॅकने सोयाबीनवर हल्ला चढविला. या सर्व परिस्थितीत सोयाबीन पीक वाढले, शेंगाही आल्या. परंतु, त्या भरल्या नाहीत. परिणामी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
विदर्भात बळीराजा चिंतेत, सोयाबिनवर येलो मोझेक, तर कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव, यंदा उत्पादन घटणार