Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
Dhananjay Munde resignation: धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तर कृषी खात्यात तब्बल 180 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्यांचा आरोप अशा विविध आरोपांमुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. अशातच धनंजय मुंडे आज राजीनामा देतील, दोन दिवसांआधी धनजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे, असा दावा करणारी फेसबुक पोस्ट करुणा शर्मा मुंडे (Karuna Munde) यांनी काल शेअर केली होती. त्यामुळे आता खरचं धनंजय मुंडे राजीनामा देणार? की सरकार राजीनामा घेणार? असे सवाल उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार का, याकडे राजकीय वर्तुळासह साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमातील धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यावेळी अजित पवार यांनी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची भेट टाळल्याची चर्चा आहे. हे दोन्ही नेते एकमेकांसमोर आले पण त्यांनी एकमेकांशी संवाद साधला नाही. या व्हीडिओत अजितदादा राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याशी बोलताना दिसतात. मात्र, त्यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या धनंजय मुंडे यांच्याशी अजित पवारांनी संवाद टाळला. भोयर यांच्याशी बोलून झाल्यानंतर अजित पवार चहा घेण्यासाठी निघाले तेव्हा धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडे वळून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्याकडे न बघता पुढे निघून गेले. त्यामुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी मात्र हे सर्व दावे फेटाळले असून सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले.
करुणा शर्मा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
मी 5 मार्चपासून धनंजय मुंडे यांच्याविरोधात उपोषण करणार होते. पण मला सूत्रांनी माहिती दिली की, तुम्ही उपोषणाला बसू नका. दोन दिवस आधीच अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतला आहे. सोमवारी राजीनामा सादर होईल. धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते. पण अजित पवारांनी त्यांचा राजीनामा लिहून घेतला. सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा सगळ्यांसमोर सादर होईल, असे करुणा शर्मा मुंडे यांनी म्हटले. '3-3-2025 को राजीनामा होगा', अशी पोस्टही करुणा मुंडे यांनी फेसबुकवर शेअर केली होती. करुणा शर्मा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांना भेटणार का, हेदेखील बघावे लागेल.
आणखी वाचा
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
























