Pune Crime Swargate: तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
Pune crime news: गेल्या मंगळवारी स्वारगेट डेपोत उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार. या तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिल्याचा दत्तात्रय गाडेचा दावा

पुणे: स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नराधम दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली होती. मात्र, त्यानंतर दत्तात्रय गाडे (dattatray gade) याने गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी पीडित तरुणीवरच खळबळजनक आरोप केले होते. मी संबंधित तरुणीवर कुठलीही बळजबरी केली नाही. तिनेच मला बोलावले आणि आम्ही बसमध्ये गेलो. तिने माझ्याकडून साडेसात हजार रुपये घेतले. तसेच, त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंटही (Agent) उपस्थित होता. पिडीत तरुणीवर बलात्कार झालाच नाही. दोघांमध्ये जे घडले ते संमतीने झाले, असा दावा दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी केला होता. तर दत्तात्रय गाडे याच्या पत्नीनेही आपल्या नवऱ्याची बाजू उचलून धरली होती. बलात्कार झाला तर मग तरुणीचे कपडे फाटले का नाहीत? तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसत आहे का? बसमध्ये चढताना आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का?, असा सवाल दत्तात्रय गाडे याच्या बायकोने उपस्थित केला होता. (Pune Rape Case)
दत्तात्रय गाडे याने वकिलांमार्फत आपण पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो, असाही दावा केला होता. त्यामुळे या दोघांच्या फोन कॉलची चौकशी व्हावी, अशी मागणी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर त्याच्या आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासले आहेत. यामध्ये कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आलेले नाही, असे वृत्त 'दैनिक लोकमत'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. (pune bus depot marathi news)
दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये
आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बँक खात्यात बलात्काराच्या घटनेपूर्वी फक्त 249 रुपये शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी दावा केल्याप्रमाणे तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी जे 7500 रुपये देण्यात आले, ते पैसे कुठून आले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुन्हा घडल्यानंतर दत्तात्रय गाडे याने आपला मोबाईल बंद केला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेऊन त्याचे बँक खाते, डिजिटल व्यवहार, ऑनलाईन पेमेंट या सगळ्याची सखोल चौकशी केली. दत्तात्रय गाडे याच्या मोबाईलमधून कोणाकोणाला पैसे ट्रान्सफर करण्यात आले? संबंधित तरुणीला पैसे देण्यात आले का? या सगळ्याचा तपास पोलिसांनी केला. मात्र, पीडित तरुणी कधीच दत्तात्रय गाडे याच्या संपर्कात नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. तसेच दत्तात्रय गाडे तरुणीला 7500 रुपये दिल्याचा जो दावा करत आहे, तोदेखील फोल ठरला आहे. कारण या घटनेपूर्वी दत्तात्रय गाडे याच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये शिल्लक होती. त्यामुळे दत्तात्रय गाडे याचा पाय आणखी खोलात गेला आहे.
आणखी वाचा























