Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
Barul Wind Mill Project : पवनचक्की ठेकेदाराने करारनाम्यात नोंद असलेल्या जमिनीपेक्षा अधिकच्या जमिनीचा ताबा घेतला आणि गुंडांकरवी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप शेतकरी सचिन ठोंबरे यांनी केला आहे.

धाराशिव : तुळजापूर येथील पवनचक्की गुंडांच्या दहशती विरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.तुळजापूर येथील बारुळ येथील पवनचक्की मारहाण प्रकरणाची आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक गौर हसन आणि आमदार राणा पाटील यांच्या भेटीनंतर शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतलं. यावेळी पवनचक्की गुंडगिरी प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं.
तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथील पवनचक्की मारहाण प्रकरणातील शेतकरी सचिन ठोंबरे यांचे कुटुंबीय आणि तुळजापूर येथील भाजप पदाधिकारी विशाल रोचकरी यांनी पवनचक्की ठेकेदार यांच्या मनमानी विरोधात तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाला बसले होते. तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि धाराशिवचे सहाय्यक पोलीस अधीक्षक गौर हसन यांनी आंदोलनस्थळी जात त्यांची भेट घेतली.
ठेकेदारावर कारवाई होणार
संबंधित ठेकेदार आणि दोषींवर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर ठोंबरे कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले. पवनचक्की गुंडाच्या दादागिरीमुळे ठोंबरे कुटुंबीयांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली. त्याबाबत पोलीस विभागाने संरक्षण देण्याचं मान्य केलं.
जिल्ह्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेणार नाहीत. कुठे असा प्रकार घडला असेल तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्याची जी समिती आहे त्यांच्याकडे लेखी अर्ज करावा. पोलीस अधीक्षकही त्या समितीचे सदस्य आहेत. गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारी असतील तर त्याही समोर आल्या पाहिजे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रकरण दाबली जातात. आता एक प्रकरण समोर आले आहे त्यामध्ये आपण सक्त कारवाई करत आहोत. अजून कुठे प्रकार घडला असेल तर त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार द्यावी, असं आवाहन तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
काय आहे प्रकरण?
तुळजापूरमधील बारुळ येथील एका पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराने सचिन ठोंबरे या शेतकऱ्याला गुंडांकरवी मारहाण केली. या ठेकेदाराने करारनाम्यामध्ये असलेल्या जमिनीपेक्षा अधिकच्या जमिनीवर कब्जा केला. त्यावर तोडगा झालेल्या धनादेश वटला नाही. हा प्रकार दोन वेळा घडल्याचं ठोंबरे कुटुंबीयांनी सांगितलं. नंतर या कंपनीच्या ठेकेदाराने सचिन ठोंबरेला मारहाण केली. तसेच कोऱ्या कागदावर त्याच्या भावाच्या सह्या घेतल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणी ठोंबरे कुटुंबीयांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. आता मारहाण करणाऱ्या या कंपनीवर आणि त्याच्या ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आमदार राणा जगजितसिंह आणि पोलिसांनी दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
