HSRP Number Plate : वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? जाणून घ्या A टू Z माहिती
HSRP Number Plate : राज्य सरकारकडून एचएसआरपी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे.

HSRP Number Plate : राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. 31 मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते. ही नंबर प्लेट नक्की कशी आहे? नंबर प्लेट आपल्याला कुठे बदलवून मिळेल? यासाठी किती खर्च आहे? जर ही नंबर प्लेट नसेल तर किती दंड आपल्यावर होऊ शकतो? याबाबत जाणून घेऊयात
याबाबत पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, या नंबर प्लेटची खासियत म्हणजे हिला एक युनिक पिन नंबर असतो. गाडीच्या पुढील बाजूची आणि मागील बाजूच्या नंबर प्लेटवर युनिट पिन नंबर असतो. तर इतर रजिस्ट्रेशन मार्क गाडीच्या पुढच्या काचेवर लावलेला असतो. या पिन नंबरची वाहन प्रणालीत माहिती असते. या पिन नंबर वरून वाहनाची माहिती मिळवता येते. या नंबर प्लेटला लावलेले स्क्रू काढून पुन्हा लावता येत नाहीत. त्यामुळे नंबर प्लेट बदलून दुसरी नंबर प्लेट वापरणे, यासारख्या गोष्टींना आळा बसतो.
31 मार्चपर्यंत नंबर प्लेट बसवणे बंधनकारक
दि. 01 एप्रिल 2019 पासून उत्पादित आणि वितरित झालेल्या वाहनांना केंद्र शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक केलेली आहे. सर्व वाहन वितरक हे एचएसआरपी नंबर प्लेट बसवूनच वाहने ताब्यात देतात. आता दि. 01 एप्रिल 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना 31 मार्च 2025 पूर्वी ही नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने बंधनकारक केलेले आहे. 31 मार्चनंतर रस्त्यावर एचएसआरटी नंबर प्लेट शिवाय वाहन आढळले तर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
एचएसआरटी नंबर प्लेटची किंमत काय?
- मोटर सायकल आणि ट्रॅक्टर साठी 450 रुपये + जीएसटी
- थ्री व्हीलरसाठी 500 रुपये + जीएसटी
- फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी 745 रुपये + जीएसटी
नंबर प्लेट कुठे मिळेल?
- transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल.
- यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल
- तुमच्या नजीकचे फिटमेंट सेंटर सिलेक्ट करा.
- आपल्याला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला जा. तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल. नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीत करेल.
अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवा
शासनाचे अधिकृत वेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणाहून ही नंबर प्लेट बदलून घेऊ नये. इतर ठिकाणाहून एचएसआरपी सारखी दिसणारी नंबर प्लेट बसवली तर त्या नंबर प्लेटच्या पिन नंबरची नोंद वाहन प्रणालीत होणार नाही. वाहन प्रणालीत आपली एचएसआरटी पेंडींगवर दिसेल. त्यामुळे अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवा.
आणखी वाचा
Pune News: भाजपच्या आमदारांचं बजेटसाठी दबावतंत्र? पिंपरी पालिका आयुक्त कोणाला झुकतं माप देणार!
























