Dhananjay Munde : खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
सोयाबीनची (Soybean) 90 दिवस हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क (Import duty on edible oil) 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Dhananjay Munde : सोयाबीनची (Soybean) 90 दिवस हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क (Import duty on edible oil) 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) सोयाबीनला चांगला भाव मिळेल असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी व्यक्त केलाय. तसेच या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत.
सोयाबीनचे उत्पन्न बंपर होणार
राज्यात सोयाबीनचा पेरा 52 लाख हेक्टर पेक्षा जास्त झाला असल्याने तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाले आहे. त्यामुळं सोयाबीनचे उत्पन्न बंपर होणार असल्याचे मुंडे म्हणाले. अशावेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा, यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टिकोनातून त्यांनी केंद्र शासनाकडे सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे. तसेच सोयाबीनच्या निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटलमागे किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे, अशा मागण्या मुंडे यांनी केल्या होत्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून केंद्र शासनाने मागील आठवड्यातच सोयाबीनची 90 दिवस हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर काल खाद्यतेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
3 पैकी 2 मागण्या मान्य केल्याबद्दल धनंजय मुंडेंनी मानले आभार
आपण केलेल्या 3 पैकी 2 मागण्या मान्य केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी ट्वीटर या सोशल प्लॅटफॉर्मद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच या निर्णयासाठी सातत्याने आग्रह धरणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
यापूर्वी किती होते आयात शुल्क?
कच्च्या खाद्यतेलावर पूर्वी 5.5 टक्के आयात शुल्क होते. ते आता 27.5 टक्के असणार आहे. तर रिफाइंड तेलावरील आयात शुल्क पूर्वीच्या 13.75 टक्क्यांवरुन आता 35.75 टक्के इतके वाढवण्यात आले आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी सोयाबीनची हमीभावाने खरेदी व्हावी, अशी मागणी करत होते. अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी केली जात होती. त्यामुळं कृषीमंत्री मुंडे यांनी सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी अशी सरकारकडे मागणी केली होती. तसेच खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे अशी मागणीही त्यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या: