BLOG | कोरोना संकट आणि बेसुमार लोक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील समजूतदार, जबाबदार आणि जाणीव असणारा वर्ग बऱ्याचदा बरेच असे प्रयत्न करतो किंबहुना तो त्याची ही जबाबदारीच समजतो. परंतु या समजावून देणाऱ्या वर्गाला किंवा व्यक्तीला या संकटाची, आपत्तीची माहिती देताना कित्येकांच्या आडमुठेपणाचाच सामना करावा लागतो. आणि हाच आडमुठेपणा कित्येक निरपराध लोकांना वेठीस धरतो. corona, c
प्रिय जणांनो...
संकटाची चाहूल, आपत्तीची भीती, अनपेक्षिताचे भय आणि बऱ्याचदा मृत्यूच्या सापळ्यात ओढवणारे कित्येक संकटं हे कायम ज्याच्या त्याच्या ताकतीने अचानक तितकेच कुणाच्याही मनिध्यानी नसताना धडकतात. ते कुठल्या जातीला, धर्माला, वंशाला, स्त्री-पुरुषाला, गरिबीला, श्रीमंतीला, हुशारीला, येडेपणाला किंवा शहराला आणि खेड्याला पाहून कधी जन्म घेत नाहीत आणि वाढतही नाहीत. ते आपल्या मूळ तीव्रतेने वावरतात कुणाच्याही अंगणात. मग इथे एका वडापावमध्ये भूक भागवणाऱ्या आणि पुलाखाली जीवन जगणाऱ्यांच्याही अंगणात आणि ब्रिटनसारख्या देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेल्या बोरिस जॉन्सन यांच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या सुसज्ज अंगणातही. मात्र, हे संकटे त्याच ताकतीने, त्याच तीव्रतेने काही लोकांना ते कधीच जाणवत नाहीत. आणि बऱ्याचदा हे लोक जाणून घेण्याचा प्रयत्नदेखील करत नाहीत.
यांच्यातील या जाणून न घेण्याच्या वृत्तीला, निर्ढावलेल्या भीतीला आणि समजून न घेण्याच्या मानसिकतेला बदलण्याचा प्रयत्नही केला जातो. समाजातील समजूतदार, जबाबदार आणि जाणीव असणारा वर्ग बऱ्याचदा बरेच असे प्रयत्न करतो किंबहुना तो त्याची ही जबाबदारीच समजतो. परंतु या समजावून देणाऱ्या वर्गाला किंवा व्यक्तीला या संकटाची, आपत्तीची माहिती देताना कित्येकांच्या आडमुठेपणाचाच सामना करावा लागतो. आणि हाच आडमुठेपणा कित्येक निरपराध लोकांना वेठीस धरतो. यामध्ये सगळेच असे असतात किंवा असे वागतात असे अजिबात नाही, यामध्ये अपवाद जरूर आहेत. मात्र या अपवादांच्या संख्येपेक्षा या आढमुठ्यांची संख्या जास्त होते, तेव्हा सामूहिक संकटात अल्प जागृतीला पाहिजे ते यश कधीच मिळत नाही. बहुदा ते मिळवताही येत नाही. आणि त्याचा आवश्यक तो परिणामही साधता येत नाही. आज नेमके हेच होत आहे या कोरोना संकटात.
हे कोरोनाचे संकट कुठल्या कुटुंबावर, कुठल्या जिल्ह्यावर, कुठल्या राज्यावर किंवा कुठल्या देशावर नाही तर ते पूर्ण जगावर कोसळलंय. या संकटाची सुरुवातच मोठ्या-मोठ्या शहरात झाल्याने आज जगभर कित्येक शहरातील रुग्णालये रुग्णांच्या संख्येने भरलेत तर अक्षरशः लोकसंख्येने हे शहरे रितेही झालेत. मानवी समुहाने या आजाराची लागण होत असल्याने स्थलांतरितांनी आपापली गावे गाठल्याने शहर अगदी ओस पडलेत. यामध्ये शहरातील मूळ रहिवाशी आणि कुठे गावी जाण्याचा ज्यांना पर्याय नाही ते शहरातच आपल्या घरी राहून कोरोना संदर्भात जी काळजी घ्यायची आहे ती पूर्ण काळजी घेत आहेत. कधी हे संकट जाईल याची वाट पाहून एक-एक दिवस मागे ढकलतायेत. मात्र, गाव-खेड्यात आणि शहरातील काही भागांत परिस्थिती वेगळी आहे. लोक काळजी घेतायेत की नाही हे पाहण्यासाठी शहरासह गावोगाव पोलीस फिरतायेत. परंतु, पोलिसांचा हा फेरा झाल्यावर गावच्या पारावर, जिल्हा परिषद शाळेच्या आवारात, शाळेच्या रिकाम्या खोल्यांत, गावाच्या बाजूला असलेल्या झाडांखाली भर दुपारी पत्त्यांचे डाव, मोबाईलवरचा लुडो खेळाचे मोठे-मोठे डाव सुरुयेत. आणि कोंबड्या कापून आणि दारूच्या बाटल्या मोकळ्या करून पार्ट्याही जोरात आहेत. तसेच गावच्या जवळच असलेल्या शहरातील चौकाचौकाच्या आजूबाजूला जमणारे जथ्थे. एवढेच काय तर व्यसनांनी बधिर झालेले आणि दारू विक्री करणाऱ्यांनी गावच्या आजूबाजूला असलेल्या शेतावर, डोंगराआड, झोपडपट्टीवर अक्षरशः दुकाने थाटलेत. इथे दारू विकणाऱ्यांची आणि दारू पिणाऱ्यांचे घोळके आजही कायम आहेत. हे कसे आणि केव्हा थांबवणार?
आम्हाला कुणाची आणि कशाची भीती अशा अविर्भावात कुठे-कुठे आणि किती दिवस वागणार आहोत आपण? "माईस लेकरू पारख झालं" ही भयंकर संकटात वारंवार उच्चारली जाते ती म्हणसुद्धा फिकी पडावी, अशी आजची ही परिस्थिती. तरी आपण आजही असेच वागणार? आपल्यातील बेजबाबदारपणाला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा तरी कुठे-कुठे आणि कशी-कशी लक्ष देणार असे आभाळ फाटत जाणाऱ्या परिस्थितीत? गाव-खेड्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या शहरात पोलीस यंत्रणा असते तरी किती? अल्प मनुष्यबळावर अशा अस्मानी संकटातही त्यांना मोठ्या धैर्याने लढावे लागते. त्यात आपल्या या बेफिकिर वागण्याला ते कसे आळा घालतील ?
असे बेसुमार वागूनही आपल्या लहानशा गावाला, हे कोरोना संकट वेढा घालणारच नाहीका ? तर ते घालू शकते. मात्र, आपल्यालेखी हा आजार आमच्याकडे येणार नाही आणि आम्हाला काही होणार नाही हाच भाव आणि तोच विचार आहे. माणसांत आत्मविश्वास जरूर असावा. मात्र, असा फाजील आणि आडमुठेपणाचा आत्मविश्वास काही कामाचा नाही. असा आत्मविश्वास फायदेशीर तर नाहीच पण ठरलाचं तर तो विघातकच ठरतो.
हे कोरोना संकट संसर्गजन्य असल्याने माणसांपासून माणसाने काही अंतर राखून बोलणे किंवा देवाण-घेवाण करणे हे हा आजार न पसरण्याचे निकष आहेत. यामध्ये कुणाजवळ शिंकू नये, थुंकू नये आणि गळा भेट किंवा हस्तांदोलन करू नये हेही प्रकर्षाने पाळायचे नियम आहेत. हे तुम्ही का समजून घेत नाहीयेत? कोणत्याही गोष्टीला 'याला कोण जुमाणतो' असे म्हणून कसे चालेल? सामूहिक संकटात त्या संकटाचे बळी ठरायला बऱ्याचदा उशीर लागतो. मात्र, त्याचे आपण बळीच ठरणार नाही हे कसं सांगता येईल? कसल्याही संकटाच्या काळात त्या संकटाचे लोण आपल्या गावात किंवा आपल्या दारात आलेले नसेल, तर 'आपल्याला काय होतंय आणि आपल्याकडे कशाचं येतंय हे' असे बेसुमार वाक्य काय वाढवून ठेवतील हे सांगता येत नाही.
आजही कित्येक गावागावात सकाळी-सकाळी दूध संकलन केंद्रावर दूध घातल्यानंतर लगेच गावातील पाण्याच्या सार्वजनिक हपशावर पाण्यासाठी गर्दी करणारी संख्या मोठी आहे. येथेही पाणी भरण्यासाठी आपला नंबर येईपर्यंत जमलेले रोजची तोंडावर तोंड असणारी ओळखीची मंडळी अगदी एकमेकांच्या जवळ येऊन, एक दुसऱ्याला तंबाखू, गुटखा, देऊन चर्चेचा फड रंगवतात. आणि याच चर्चेच्या फडात करोना कुठपर्यंत आला, कसा आला, कुणामुळे झाला, कसा झाला आणि किती मृत्यू झाले याची जोरदार चर्चा करतायेत आपल्याकडे येणारच नाही या अविर्भावात.
गावागावात पोलिसांच्या गाड्या फिरतायेत. जे लोक रोडवर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना दिसतील तिथे जाऊन या लोकांना चांगला चोपही दिला जातोय. मात्र, तरीही गाव-गाव 'आम्हाला कुणाची भीती' या आवेशात फिरणाऱ्या टग्यांना कसे आवरणार? इतके पोलीस आणणार तरी कुठून? आहेत ते पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जीवाचे रान करतायेत. तर एकीकडे घराबाहेर पडण्यासाठी काही महाभाग जीवाचे रान करतायेत अगदी किरकोळ किंवा काहीच महत्वाचे काम नसतानाही. पोलीस प्रत्येक गावात एकदोन चकरा नियमित मारताहेत परंतु या पोलिसांचा एकदोन चकरांचा वेळ सोडून मधल्या वेळेत आपापले बिनकामाचे बाहेर पडण्याचे मनसुबे हे बेमुर्त लोक पूर्ण करतात.
काही गावांत बऱ्याच ठिकाणी कुणाकुणाची कापसाची शेवटची वेचणी सुरू आहे. कापूस वेचण्यासाठी, कापूस उपटण्यासाठी, कुणाचा कांदा काढण्यासाठी, कांदा काटण्यासाठी अक्षरशः दहा-दहा पंधरा-पंधरा अशा संख्येने लोक जमतात. हे काम करू नयेत असे मुळीच नाही. ते जरूर करावे. मात्र, घेयची ती काळजी थोडीही घेतली जात नाही हा मुद्दा आहे. या आजाराविषयी त्यांच्याशी बोलले की सांगतात 'हा आपल्याकडे कशाचा आलाय रोग, आला असेल तिकडं पुण्या-मुंबईला'. हे त्यांचे बोल ऐकले की पुढचे आता काहीच बोलायला नको अशीच सर्वसाधारण भावना होते.
बऱ्याच ठिकाणी आपल्या बेमुर्त वागण्याला मर्यादा घातल्या जतायेत म्हणून काही लोक हा बेमुर्तपणा रात्रीची संधी साधून करतात. संध्याकाळी आठ-नऊच्या सुमारास गाईंच्या धारा (दूध) काढून झाले की चालले एकमेकांच्या घरी गप्पा-टप्पा मारायला. हा नियम अगोदर गावांत, वस्तीवर ज्या जोमाने चालू होता त्याच जोमाने करोना संकट आल्यावरही बऱ्याच ठिकाणी चालू आहे. कुणाला जवळ सासरवाडीला जायचे असते, कुणाची वास्तूशांती असते, कुणाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो तर कुणाचा वाढदिवसाचा कार्यक्रम असतो. इतकेच काय कुणाच्या घरात कुणी वृद्ध व्यक्ती वारली तर काही ठिकाणी त्या कुटुंबासह काही नातेवाईकांचा म्हणजे 15 ते 20 लोकांचा फोटो पोलिसांना दाखवून परवानगी घेतात आणि प्रत्यक्ष किमान 200 लोकांच्या उपस्थितीत हे अंत्यविधी पार पडतात. आणि गाव खेड्यांत या करोना संकटातही अंत्यविधीला इतके लोक जमतातही.
हे सगळे कार्यक्रम अल्पसंख्येत नाही तर बहूसंख्येत आणि भरगच्च गर्दीने 'त्याला काय होतंय' असे म्हणत पार पाडतायेत. का समजून घेत नाहीयेत? कुणाला फसवतायेत तुम्ही? एका ठिकाणी कोणत्याना कोणत्या कारणाने जमलात की दिवसभरात इकडून तिकडून ऐकलेल्या गोष्टींवर बोलत राहतात. रात्रीच्या 12 तर कधी एकही वाजेपर्यंत. दुसरीकडे बायकांचेही कोणत्याना कोणत्या देवांच्या सवासनी घालण्याचा कार्यक्रम जोरात आहे. मग ज्यांच्या सवासनी आहेत त्यांच्या घरी स्वयंपाकाला आलेल्या आठ-दहा आणि सवासीन म्हणून आलेल्या चार-पाच असा दहा पंधरा बायकांचा गलबला दिवसभर असतो. सवासनी घालायच्या आहेत तर जरूर घाला. परंतु हे संकट जाईपर्यंत तरी थांबा.
आज गावाकडे असा सगळ्याच स्थरावर मोठ्या प्रमाणात आणि तितकाच सरसकट होणारा वावर काही प्रमाणात कमी झाला असला तरी ज्या तीव्रतेने तो कमी व्हायला हवा होता तो काही झाला नाही. आणि हीच मोठी शोकांतिका आहे आणि कदाचित हाच मोठा धोका ठरू शकतो.
आता यामध्ये सरकारची, प्रशासकीय यंत्रणेची, त्या त्या भागातील पोलिसांची काही चूक आहेका? तर यांची काहीच चूक नाही. त्यांच्या त्यांच्या अधिकारात आणि नियोजनात जमेल त्यापेक्षा कैकपटीने हे सर्वच लोक प्रयत्न करतायेत. आणि गाव-खेड्यांत सगळेच लोक असे बेजबाबदार वागतायेत का? तर तेही अजिबात नाही. मात्र, बेजबाबदार वागणाऱ्यांची संख्या दखल न घेण्याइतकी नक्कीच कमी नाही. समजूतदारपणा हा माणसाचा सर्वात सर्वोच्च संस्कार. मात्र, काही गावांत, काही शहरांत, काही भागांत आणि काही लोकांत हा संस्कार पूर्णतः रसातळाला गेलेला आज पाहायला मिळतोय. तो संस्कार असाच रसातळाला जात राहिला तर सगळ्यांना रासातळाकड़ची वाट धरावी लागेल कारण हा कोरोना आजार असा माणसाने माणसांकडे प्रवास करत असल्याने कितीही काटेकोर नियम पाळले तरी काही गांभीर्य हरवलेल्या लोकांमुळे धोका निर्माण होतो. आणि हा धोका लोकांसह व्यवस्थेलाही मोठी अडचण निर्माण करणारा ठरतो.
प्रिय जणांनो, शहरी आणि ग्रामीण असा इतर कुठलाही इथे भेदाभेद नाही, तो करायचाही नाही आणि तो करणेही योग्य नाही. मात्र, काही बाबतीतली दरी ही निदान अशा गंभीर संकटात तरी मिटली पाहिजे. मात्र, दुर्दैवाने ती आजही कायम जाणवते आहे. ती दरी म्हणजे समजून न घेण्याची आणि गांभीर्य न बाळगण्याची. या करोना संकटात असंख्य लोक पूर्णपणे जबाबदारीने, समजदारपणे आणि तितकेच गंभीर्याने वागत असताना कित्येक गावखेड्यांत आणि शहरांतही समजून न घेण्याची, खबरदारीने न वागण्याची आणि कसलेच गांभीर्य न बाळगण्याची आणि आम्हाला कुणाची भीती या अविर्भावात वागण्याची दरी आजही कायम आहे मोठी-मोठी शहरे, देश आणि संपूर्ण जग कोरोना या संकटाने हादरले असतानाही.
हे कुठेतरी थांबायला हवे, कारण सध्या फक्त सर्दी खोकला असला तरी गावखेड्यातली डॉक्टर दवाखाने उघडे ठेवायला आणि रुग्णांवर उपचार करायला तयार नाहीत. जर करोनासारख्या आजाराने आपल्या गावखेड्यांचा गळा आवळला तर तो कसा आणि कोण सोडवणार. आज कित्येक मोठी मोठी शहरे आणि हॉस्पिटल्स हतबल झालीयेत. म्हणून आपणच आपल्या गळ्याला करोनारुपी फास बसणार नाही याची काळजी घेणे इतकाच काय तो या करोणावर खरा उपाय !.... म्हणून हात जोडून विनंती आपल्यांसाठी आपली काळजी घ्या. आपल्यामुळे कुणाचे जीवन उद्ध्वस्त करू नका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले तरी जीवन का उद्ध्वस्थ करता.