सदाबहार संझगिरी....

Dwarkanath Sanzgiri Passes Away: पप्पू गेला... आमचा कॉमन फ्रेण्ड आणि दिल्लीचा ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्लीचा व्हॉट्सअॅप संदेश माझ्यावर मोबाईलवर झळकला आणि पुढच्या क्षणी तब्बल ३६ वर्षांचा काळ रिवाईंड होऊन माझ्या डोळ्यांसमोर फ्लॅशबॅक सुरु झाला.
वर्ष होतं १९८९... बरोब्बर, १० जून रोजी मी दैनिक सामना वर्तमानपत्रात क्रीडा प्रतिनिधी म्हणून रुजू झालो. तोवर दादरच्या कीर्ती कॉलेजचं एनसीसीसह अॅथलेटिक्स आणि बॉक्सिंगसारख्या खेळांमध्ये आंतरमहाविद्यालयीन स्तरावर प्रतिनिधित्व करणारा मी क्रीडा पत्रकारितेत करियर करेन असा कधी विचारही केला नव्हता. पण त्याआधी ट्रेकिंग आणि माऊंटेनियरिंगसारख्या साहसी खेळाविषयीचे माझे लेख मार्मिक आणि सामनामध्ये प्रसिद्ध झाले होते. पण ते लिखाण म्हणजे काही क्रीडा पत्रकारिता नव्हती. त्यामुळं माझं क्रीडा पत्रकारितेतलं प्रशिक्षण हे खऱ्या अर्थानं ‘सामना’तल्या नोकरीबरोबरच सुरु झालं.
त्या काळात महाराष्ट्र टाईम्सचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर आणि चंद्रशेखर संत यांनी लिहिलेल्या बातम्या, आणि ‘लोकसत्ता’च्या क्रीडा पुरवणीत द्वारकानाथ संझगिरींनी लिहिलेले लेख आमच्या पिढीतल्या क्रीडा पत्रकारांसाठी त्या काळात जणू प्रशिक्षण वर्गच होता. त्यात चंद्रशेखर संत म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीनं फारसे कुणाला न दुखावता बातमी किंवा मुद्दा मांडणारे, करमरकर म्हणजे वाक्यागणिक आपल्याला भल्याभल्यांना ठोकायचं आहे या अविर्भावात, मग खेळातल्या स्टॅटिस्टिक्सचा हिशेब देत आपली बातमी किंवा मुद्दा सांगणारे. पण संझगिरी त्या दोघांपेक्षा फारच वेगळे. वर्तमानपत्रात रोज दळून झालेल्या मुद्द्यांच्या पलिकडे जाऊन आपल्या वाचकाला भावतील अशी; रोजच्या जीवनातली, राजकारणातली, समाजकारणातली, साहित्यातली, रुपेरी पडद्यावरची किंवा संगीताच्या दुनियेतली उदाहरणं पेरून वाचकाला खुदखुदू हसायला लावणारे आणि त्यासोबतच आपला मुद्दा पटवूनही देणारे.
मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुझुमदार परवाच सांगत होता... ड्रेसिंगरूममध्ये किंवा दौऱ्यावर फावला वेळ असला की, गप्पांच्या ओघात आम्ही संझगिरींनी दिलेली उदाहरणं आठवून आठवून हसत राहायचो. एकदा टर्निंग विकेटवर कमेंट करताना संझगिरींनी लिहिलं होतं, या विकेटवर ऑफ स्पिनर आशीष कपूरनंच काय, पण ऋषी कपूरनंही चेंडू फिरवला असता. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या चेंडू उशिरानं खेळण्याच्या शैलीचं संझगिरींच्या भाषेतलं वर्णन हे आळसावलेलं सौंदर्य असं असायचं. सचिन तेंडुलकरसारखा असामान्य फलंदाज एखाद्या वेगवान गोलंदाजालाही ज्या सहजतेनं सामोरा जायचा, त्यावेळी संझगिरी म्हणायचे की सचिनकडे चहाचा घोट घेऊन चेंडूला सामोरा जाण्याइतपत वेळ होता.डेव्हिड जॉन्सनच्या वेगाची खिल्ली उडवताना त्यांनी लिहिलं होतं की, जॉन्सन फॉलो थ्रूमध्ये आणखी थोडं अंतर धावला तर तोच चेंडूच्या आधी समोरच्या एंडला पोहोचेल. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरनच्या चेंडू वळवण्याच्या कमालीच्या क्षमतेचं वर्णन करताना ते लिहायचे की, मुरलीधरन पाटा खेळपट्टीवरच काय, पण प्लायवूडवरही चेंडू वळवू शकतो.
द्वारकानाथ संझगिरीची हीच शैली वाचक म्हणून त्यांच्या प्रेमात पाडणारी होती. कारण सर्वसामान्य नोकरदाराला, सर्वसामान्य गृहिणीला, कॉलेजच्या पोरापोरींना संझगिरींच्या लेखातून क्रिकेट सहज समजू लागलं होतं. मग प्रश्न पडायचा की या माणसाला हे सुचतं कसं? पण संझगिरींना त्यात काही अवघड होतं असं वाटत नाही. कारण त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर पु. ल. देशपांडेचा प्रभाव होता. संझगिरी ‘पुलं’सारखे ज्या सहजतेनं बोलायचे ना, तसंच ते लिहायचे. मुळात क्रिकेटइतकीच त्यांना मराठी साहित्य, सिनेसंगीत, हिंदी चित्रपट, राजकारण आणि समाजकारण या विषयांमध्येही गती होती. त्यामुळं त्यातलीच उदाहरणं ते आपल्या लेखात पेरायचे. साहजिकच त्यांचा लेख खुसखुशीत व्हायचा. त्याची चव दीर्घकाळ तुमच्या मेंदूत रेंगाळत राहायची.
‘लोकसत्ता’चा वाचक या नात्यानं संझगिरींचा फॅन झालेलो मी, क्रीडा पत्रकारितेत आलो आणि पप्पू म्हणून त्याचा मित्र कधी झालो हे मलाही कळलं नाही. त्याला निमित्त होतं माझी ‘सांज लोकसत्ता’तली नोकरी. नव्वदच्या दशकात मुंबईत सायंदैनिकांचं पीक आलं होतं. त्यात ‘सांज लोकसत्ता’चा रुबाब आणि खपही मोठा होता. आमच्या ‘सांज लोकसत्ता’च्या खेळाच्या पानांवर हर्षा भोगले, मकरंद वायंगणकर आणि द्वारकानाथ संझगिरी यांच्यासारख्या तीन-तीन मोहऱ्यांची टीम स्तंभलेखन करायची. माझ्यासाठी ती पुन्हा एक शिकण्याची मोठी पर्वणी होती. त्या काळात पप्पूकडे फॅक्स आला नव्हता. त्यामुळं रात्री उशिरा किंवा पहाटे ऑफिसला जाण्याआधी मी पप्पूच्या हेंद्रे कॅसलमधल्या घरी जाऊन मी त्याचा लेख घ्यायचो. त्यामुळं पप्पूच काय, पण त्याची पत्नी कल्पा, मुलं रोहन-सनील आणि सख्खा दोस्त मकरंद यांच्याशीही माझं नातं जुळलं.
एकदा पप्पूच लेख घेऊन प्रभादेवीतल्या माझ्या चाळीतल्या घरी येणार होता. माझी शंभर टक्के शाकाहारी असणारी आई मांसाहारी जेवण उत्तम बनवायची. त्यामुळं पप्पूला न सांगताच मी पापलेटच्या कालवणाचा बेत आखला होता. तो आला आणि आमच्या गप्पा सुरु असताना त्याला कळलं की आईनं जेवण बनवलंय. तो म्हणाला की, आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळं माझे मित्र घरी येणार आहेत आणि त्यांच्यासाठी घरी जेवणाचा बेत आहे. पण सांगायची गोष्ट ही आहे की मला जेवणात मीठ चालत नाही. पप्पूनं त्या अळणी जेवणाचं सांगितलेलं कारण हा माझ्यासाठी धक्काच होता. त्यावेळी पप्पू साधारण ४५-४६ वर्षांचा होता. पण सदा हसतमुख असणारा तुमचा तो जिंदादिल मित्र त्याच्या आयुष्यात सातआठ वर्षांपूर्वीच हृदयविकाराचा त्रास सुरु झाला असल्याचं जेव्हा सांगतो, ते धक्का देणारंच असतं. पण पप्पूच्या मनाचा मोठेपणा हा की, माझ्या आईला वाईट वाटू नये म्हणून त्यानं एक चपाती आणि कालवणातल्या फक्त माशासोबत खाल्ला होता.
पप्पू एक मित्र म्हणून माझ्या आणखी जवळ आला तो १९९५ सालच्या स्पोर्टस जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईनं आयोजित केलेल्या महिन्याभराच्या युरोप टूरनं. लंडनमधल्या १५ दिवसांच्या वास्तव्यात त्यानं आपल्या मित्रांच्या घरी मला हक्कानं नेलं. लंडनमधल्या शॉपिंगमध्ये त्यानंच मला अॅक्वा दी जिओ जॉर्जियो अरमानी हा फ्रॅगरन्स पसंत करून दिला. पप्पूची ती पसंती आज ३० वर्षांनंतरही माझा लाईफटाईम फ्रॅगरन्स आहे. बरं, ते शॉपिंग करताना त्यानं मला केवळ अरमानीच नाही, तर गुची, शॅनल, वर्साची आदी फॅशन ब्रॅण्ड्सचीही यच्चयावत माहिती दिली होती. आणि मला हव्या त्या गोष्टी शॉपिंगही करून दिल्या होत्या. १९९५ साली लंडन आणि युरोप आजच्या इतकं भारतीय वळणाचं झालेलं नव्हतं. पण तुमच्यापेक्षा वयानं १८ वर्षांनी मोठी असलेली व्यक्ती तुमच्या खांद्यावर हात टाकून तुमचा मित्र बनते ना, त्यावेळी एक महिना घरापासून दूर राहणं सोपं बनतं. मग १९९९ साली क्रिकेट विश्वचषक आणि २००५ साली पाकिस्तान दौऱ्याच्या कव्हरेजच्या निमित्तानं मला पुन्हा तोच अनुभव आला. आणि त्या दोन्ही दौऱ्यांमध्ये पप्पूसोबत कल्पाही होती. त्यामुळं पप्पूसोबत तिनं आमच्याही पोटाची उत्तम बडदास्त ठेवली.
पप्पू आणि कल्पाचं ते आदरातिथ्य आणि त्यांचं प्रेम माझ्यासह अनेक पत्रकारांनी आणि रथीमहारथी क्रिकेटवीरांनीही अनुभवलंय. त्यामुळं एका जमान्यातल्या मुंबई, भारत आणि श्रीलंका टीम्स या संझगिरी दाम्पत्याची जीवाभावाची मंडळी होती. एकदा एखाद्या क्रिकेटरवर जीव लावला ना की, पप्पू कठीण काळात त्याच्यासाठी ढाल बनून उभा राहायचा. भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकरांवर झालेली अन्यायी टीका पप्पूला सहन झाली नव्हती. त्यामुळं त्यानं वाडेकरांच्या बचावासाठी म्हणून पहिल्यांदा लेखणी परजली. आणि मग ती लेखणी तुम्हाआम्हाला क्रिकेटचा आनंद देण्यासाठी अविरत लिहिती राहिली. प्रवीण अमरे, समीर दिघे, अजित आगरकर, संजय पाटील यांच्यासह अनेक गुणवान शिलेदारांसाठी पप्पूची लेखणी लढाऊ बाण्यानं चालली. सुनील गावस्करांपासून सचिन तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकरपासून विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यापर्यंत अनेक शिलेदारांचं महात्म्य पप्पूनं त्याच्या शैलीत मराठी घराघरात पोहोचवलं. त्यापैकी कित्येकांनी तर हेंद्रे कॅसलमधल्या त्याच्या दीड खोल्यांच्या घरात जेवणासोबत गप्पांचीही मैफिल सजवलीय. त्यातूनच पप्पूमधल्या लेखकाला आणि वक्त्याला काही ऑन रेकॉर्ड आणि काही ऑफ रेकॉर्ड किश्श्यांचा जणू खजिना मिळाला. पप्पूनं त्यातल्या ऑन रेकॉर्ड किश्श्यांचा समयोचित वापर करून तुमचं आमचं जीवन वारंवार समृद्ध केलं.
पप्पू संझगिरीची ही जिंदादिल वृत्ती जुन्या जमान्यातील क्रिकेट समालोचक सुरेश सरैयांना जाम भावायची. सरैयांची खासियत म्हणजे ते बोलताना कुणालाही वाटाणा म्हणूनच संबोधायचे. माणूस खास मैत्रीतला असला की ते हाकही ‘ए वाटाण्या’ म्हणून मारायचे. मूडमध्ये असले की, त्यांच्या आयुष्यातल्या वाटाण्यांचं म्हणजे मित्रांचं वर्गीकरण करायचे. त्यात पप्पूचा उल्लेख आला की, म्हणायचे हा माझ्यासारखाच हिरवा वाटाणा आहे. अगदी खरं होतं ते. कायम तजेलदार चेहरा, उत्साहाचा धबधबा असलेला पप्पू वृत्तीनं चिरतरुण, सदाबहार होता. फुलाफुलांचे, रंगीबेरंगी किंवा फ्लुरोसण्ट शर्टस त्याला जाम आवडायचे. तो वाढत्या वयातही ते शर्टस बिनदिक्कत वापरायचा. पप्पू हे टोपणनाव सोन्यात घडवलेली साखळी त्याच्या गळ्यात कायम असायची. पण तो ‘एबीपी माझा’वरच्या शोलाही, कॅमेराला न चालणाऱ्या रंगांचे शर्टस घालून यायचा, तेव्हा पंचाईत व्हायची. त्यात तो वेळेत न पोहोचल्यानं कॅमेरासमोर त्याच्या शर्टच्या रंगाची आधी टेस्टही झालेली नसायची. मग त्या परिस्थितीत ऐनवेळी पप्पूच्या साईजचा ब्लेझर शोधण्यासाठी मेकअप रूममध्ये मोठी धावपळ उडायची.
भारतानं जिंकलेल्या २०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकानंतर, अनेक कारणांनी न्यूज चॅनेलवरचं स्पोर्टस शोचं प्रस्थ हळूहळू कमी झालं. पण पप्पू थांबला नाही. त्यानं आपला मोर्चा स्टॅण्ड अप टॉक शो आणि चित्रपट संगीताच्या कार्यक्रमांकडे वळवला. त्याला आधी लिहायला आवडायचं आणि मग त्याला क्रिकेटवर किंवा सिनेसंगीतावर बोलायला प्रचंड आवडू लागलं. त्यातही त्याचा हातखंडा निर्माण झाला. खरं क्रिकेटइतकाच सिनेमाही पप्पूच्या रक्तात होता. त्यामुळं क्रिकेटवरच्या लेखातही त्याचा फेव्हरिट देव आनंद किंवा त्याला आवडणाऱ्या मधुबाला आणि वहिदा रेहमान यांची उदाहरणं डोकावायची. पिढ्यांमागून पिढ्या बदलल्या. पप्पूच्या लिखाणातले क्रिकेट हीरोही बदलले. पण उदाहरणं देताना त्यानं कायम सदाबहार देव आनंद आणि मधुबालाच्या स्वर्गीय सौंदर्याचंच परिमाण लावलं. मी एकदा त्याला म्हटलंही की, पप्पू आजच्या पिढीशी संवाद साधताना तरी देव आनंद, मधुबाला किंवा वहिदा रेहमानची उदाहरणं नको ना देऊ. पण पप्पूनं ते कधीच ऐकलं नाही. त्यानं रणजी आणि कसोटी सामने आपला क्रिकेटचा पिंड जोपासला होता. पण बदलत्या जमान्यात त्यानं वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी या फॉरमॅट्सचा आनंदही मनमुराद लुटला. त्यावरही तो लिहिता राहिला. त्यानं नव्या फॉरमॅट्सला नाक मुरडलं नाही. पण त्याच्या हृदयातील नायक मात्र निव्वळ कसोटी फॉरमॅटशी नातं सांगणारे राहिले. म्हणूनच सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या भेटीचं वर्णन त्यानं ‘अजि म्या ब्रह्म पाहिलं’ असंच केलं. पप्पूनं एक क्रिकेटर नात्यानं या खेळातल्या हजारो गुणवान शिलेदारांवर भरभरून प्रेम केलं. पण डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर त्यानं आपल्या हृदयाचा हळवा कोपरा हा फक्त सचिन रमेश तेंडुलकरला बहाल केला होता. त्याचा चॉईसच खास होता... अगदी मला सुचवलेल्या अॅक्वा दी जिओ या जॉर्जियो अरमानी ब्रॅण्डच्या फ्रॅगरन्ससारखा.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
