Latur Rain : लातूर जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस, सोयाबीनची रास लांबणीवर, दिवाळी सणावर पाणी
लातूर जिल्ह्यात देखील परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

Latur Rain : राज्यात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचलं आहे. त्यामुळं हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया गेली आहेत. लातूर (Latur) जिल्ह्यात देखील परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका सोयाबीन (soybean) उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामुळं सोयाबीनची रास करणंही अवघड झालं आहे.
काल (21 ऑक्टोबर) संध्याकाळपासूनच लातूर शहर आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरण तयार झालं होतं. संध्याकाळच्या सुमानाचे जवळपास एक तास पावसानं जोरदार हजेरी लावली होती. चार साडेचार तासाच्या उसंतीनंतर पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. रात्री दहानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, मागील तीन ते चार दिवसापासून पावसानं उसंत घेतली होती. आता कुठे शेत शिवारातील ओल कमी होत होती. पाण्याचा निचरा झाल्यानंतर सोयाबीन वाळल्यानंतर रास करण्यासाठी अनेक शेतकरी वाट पाहत होते. मात्र, या पावसानं त्यांची रास करण्याची वेळ अक्षरशः खूप पुढे नेली आहे. यामुळं सोयाबीन बाजारात घालणं शक्य नाही. त्यामुळं हातात नकदी पैसा नसल्यानं याचा सगळा प्रभाव दिवाळीच्या सणावर पडणार आहे.
परतीच्या पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका
परतीच्या पावसाचा मोठा फटका मराठवाड्याला बसला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेज, परभणी, लातूर, बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या उभ्या पिकात पाणी साचलं आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झाल्याची स्थिती आहे. त्यामुळं दिवाळी सण कसा साजरा करायचा असा प्रश्न बळीराजासमोर उभा आहे. या नुकसानीमुळं शेतकरी प्रचंड तणावात आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. मराठवाड्यातील परभणीत दोन शेतकऱ्यांनी, बीड जिल्ह्यात एक तर नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं जीवन संपवलं आहे.
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
या नुकसानीमुळं शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, काल कृषीमंत्री अब्दुल सत्तार बोलताना म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही. मात्र, नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे कृषीमंत्री सत्तार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Aurangabad: ना पालकमंत्री, ना जिल्हाधिकारी...; खासदारांनाही मिळेना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी वेळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
