Aurangabad: ना पालकमंत्री, ना जिल्हाधिकारी...; खासदारांनाही मिळेना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी वेळ
Aurangabad: शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असताना, ना जिल्हाधिकारी पाहणीसाठी बांधावर गेले ना पालकमंत्री, खासदार यांना वेळ मिळाला आहे.
Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालं आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप होतोय. कारण गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असताना, ना जिल्हाधिकारी पाहणीसाठी बांधावर गेले ना पालकमंत्री, खासदार यांना वेळ मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी पावसाने (Rain) हतबल झाला आहे. अशावेळी प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी (Collector) यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणं अपेक्षित असते. मात्र नुकत्याच बदलून आलेले नूतन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडये (Astik Kumar Pandey) सत्कार स्वीकारण्यात व्यस्थ असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी पदाचा कारभार हाती घेणाऱ्या पांडये यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कधी वेळ मिळणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे. तर ग्रामीण भागातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी देखील बांधावर जायला तयार नसल्याचे चित्र आहे.
पालकमंत्री बैठकांमध्ये व्यस्त...
औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलं आहे. अशावेळी लोकप्रतिनिधी यांच्याकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा असते. पण औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipanrao Bhumre) सद्या बैठकांमध्येचं व्यस्त असल्याचे पाहायला मिळतायत. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे, पण पालकमंत्री भुमरे काही नुकसानीच्या पाहणीसाठी बांधावर पोहचले नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे किमान आतातरी पालकमंत्री यांना यांना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ मिळेल का? हे पाहणं महत्वाचे ठरेल.
खासदारांना कधी वेळ मिळणार...
जिल्ह्यात शेतकरी संकटात आहे तर दुसरीकडे जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) मात्र क्रिकेट स्पर्धाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असताना खासदार जलील यांना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ नसल्याच पाहायला मिळत आहे. तर जलील हे फक्त औरंगाबाद शहराचे खासदार आहेत की, जिल्ह्याचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आतातरी खासदार यांना शेतकऱ्यांचे अडचणी जाणून घेण्यासाठी वेळ मिळेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातमी...
Aurangabad: औरंगाबादच्या वजनापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, शेताला तळ्याचे स्वरूप