2000 मध्ये सोयाबीनला 4500 रुपयांचा दर, 2023 मध्येही तोच दर; बच्चूभाऊंचा प्रहार
प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेती प्रश्नांच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका मांडली आहे. शेतमालाचे दर पडले आहेत, यावरुनच बच्चू कडू यांनी सरकारला सवाल केले आहेत.
Bacchu Kadu : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. (Maharashtra Assembly Winter Session) या अधिवेशनात विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा कलगीतुरा चांगलाच रंगताना दिसत आहे. दरम्यान, सत्ताधारी बाकावरील काही आमदारही आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील शेती प्रश्नांच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका मांडली आहे. शेतमालाचे दर पडले आहेत, यावरुनच बच्चू कडू यांनी सरकारला सवाल केले आहेत.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू
शेतमालाच्या बाबतीत काँग्रेसच्या काळात तेच होत होते आणि आता भाजपच्या काळातही तेच होत असल्याचे बच्चू कडू म्हणाले. 2000 साली सोयाबीनला (Soybean) साडेचार हजार रुपयांचा दर होता. आज तब्बल 23 वर्षांनी 2023 मध्ये देखील सोयाबीनला साडेचार हजार रुपयांचांच दर आहे. 2000 मध्ये सोयाबीनला तेवढाच दर आणि 2023 मध्येही तेवढाच दर आहे. 2000 मध्ये संत्रा 30000 रुपये टन होता आणि 2023 मध्ये देखील संत्रा 30000 रुपये टनच आहे. काहीच बदल नाही. कापूस 10000 रुपये क्विंटलवर गेला होता, आता सहा हजार रुपये क्विंटल आहे. या सर्व पिकांचा उत्पादन खर्च वाढला आहे, मात्र, दर वाढला नसल्याचे बच्चू कडू म्हणाले.
सगळ्या पक्षांनी सर्व लोकांना जाती धर्मात अडकवून ठेवलं
सगळ्या पक्षांनी सर्व लोकांना जाती धर्मात अडकवून ठेवल्याचे बच्चू कडू म्हणाले. हिरव्या, निळ्या आणि भगव्या रंगात लोकांना गुंतवूण ठेवल्याचे बच्चू कडू म्हणाले. शेतकऱ्याची व्यवस्थित फाळणी केली आहे. शेतकऱ्याला राजकारण्यांनी जाती धर्मात गुंतवण्याचा प्रयत्न केल्याचे बच्चू कडू म्हणाले. चना 4500 होता आता 4700 झाला आहे. तुर 14500 होती आणि आता 10000 झाली आहे. पेट्रोलचे दर 2000 मध्ये 66 रुपये होते, आता 107 रुपये झाले. डिझेल 56 वरुन 97 वर गेले. डिएफए खत 482 वरुन 1350 वर गेले आहे. 400 चे खत 1300 रुपयाला विकत आहेत. 10:10:26 हे खत 365 रुपयाला होतो ते 1700 वर गेले. 18: 18: 10 च खत 412 होते ते 1300 वर गेले असल्याचे बच्चू कडू म्हणाले. अरे किती लुटणार असेही बच्चू कडू म्हणाले.
सध्या शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. एकीकडं उत्पादन खर्च वाढत असताना पिकांचे दर मात्र वाढत नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याच मुद्यावरुन बच्चू कडू यांनी सरकारला काही सवाल करत जोरदार टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या: