दलित मुख्यमंत्री होऊ शकत नाही का?, प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा; बच्चू कडू थेट सभागृहात बोलले
Bachchu Kadu : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी शरीरात जात घुसू दिली नाही.पण आपण पुतळ्याला जात लावतो, असेही बच्चू कडू म्हणाले.
नागपूर : जातीपाती मी मानत नाही, जात लागली की मरेपर्यंत जात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी शरीरात जात घुसू दिली नाही. पण आपण पुतळ्याला जात लावतो. हिंदू खतरे में है म्हणतात, पण कोणीच खतरे में नहीं है. नेता खतरे में है. त्यामुळे, हे सर्व थांबवायचं असल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) याना मुख्यमंत्री (Chief Minister) केले पाहिजे. दलित मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असं माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
पुढे बोलतांना बच्चू कडू म्हणाले की, "काही सभा बघितल्या, त्यात 160 आमदार पाडू असे म्हणाले. काय भाषा आहे. विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका. मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या किती वाईट आहे. 50 आत्महत्या झाल्या, यावर कोणी बोलत नाही. एवढे आपण जातीवादी झालोय. एखाद्या आंदोलनात लाठीचार्ज करता, त्याची चौकशी झाली पाहिजे. तुमच्या बाजूला गृहमंत्री बसतात आणि आग कशी लावली म्हणता. बाजूला अर्थमंत्री बसतात आणि म्हणता ओबीसीला काही दिल नाही. ही भाषा मंत्रीमंडळ बैठकीत केली पाहिजे. अशी भाषा जनमानसातील नाही, असा खोचक टोला बच्चू कडू यांनी छगन भुजबळ यांना लगावला.
छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस, जितेंद्र आव्हाद सर्वच मराठे...
महात्मा फुले यांचा दाखला आहे. महाराष्ट्रातील महारापासुन ते ब्राह्मणपर्यंत सर्व मराठे आहेत. त्यामुळे इथे बसलेले भुजबळ, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस, जितेंद्र आव्हाड हे सर्व मराठे आहेत. ज्याचे आमदार जास्त त्यांना कमी आरक्षण द्याल अस म्हणत असाल तर 200 आमदार असलेल्यांना आरक्षण द्यायच नाही का?, असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते. त्यामुळे पुरावे शोधल गेले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले. हे देखील यांना मान्य नाही. मराठा समाजात किती आमदार आणि खासदार आहेत यावरून ते मागास नाही असे कसं म्हणता येईल? असेही बच्चू कडू म्हणाले.
त्यांची हात पाय तोडून टाका
माझ्यावर टीका केली तर ठीक आहे, पण ज्या दिवशी तुम्ही जातीवर बोलायला लागल. मराठ्यांनी असं केलं, मराठ्यांनी तसं केलं, आमच्या स्मशानभूमी अडवल्या अशा पद्धतीने तुम्ही बोलत आहात. मराठा समाज जणू अन्याय करणारी जमात झाली असल्याचं चित्र उभं करण्यात येत आहे. राजकारण होत राहील. तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मात्र विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका. अमृत पाजून मुख्यमंत्री व्हा, आणि असं होता येते. घरं जाळण्यात आली याचा निषेध केलाच पाहिजे. घर जाळण्यापर्यंत हात जात असतील तर त्यांची हात पाय तोडून टाका, असेही बच्चू कडू म्हणाले
इतर महत्वाच्या बातम्या:
छगन भुजबळ महाराष्ट्रला लागलेला कलंक, बीडची दंगल त्यांनीच घडवली : मनोज जरांगे