आज IPL संदर्भातील मोठ्या निर्णयाची शक्यता; BCCI ची महत्त्वाची बैठक
बीसीसीआयच्या या बैठकीमध्ये येऊ घातलेल्या टी 20 विश्वचषकाबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई : बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट बोर्डाची एक महत्त्वाची बैठक आज (शनिवारी) दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी सुरु होऊन अर्ध्यावरच थांबवण्यात आलेल्या आयपीएलच्या 14 पर्वातील उर्वरित सामन्यांसंदर्भात निर्णय घेणं हे या बैठकीचं मुख्य लक्ष्य असणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचा कहर थेट आयपीएलमधील संगांपर्यंतही पोहोचल्यामुळं स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
बीसीसीआयच्या या बैठकीमध्ये येऊ घातलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषकाबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. येत्या काळात टी 20 विश्वचषकाची ही स्पर्धा युएई अर्थात संयुक्त अरब अमीरात येथे आयोजित केली जाण्याची चिन्हं आहेत. भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यानंतर 15 दिवसांनी बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्याच्या निर्णयावर पोहोचू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यास्पर्धेतील उर्वरित 31 सामन्यांचं आयोजन युएईमध्येच केलं जाणार असल्याचं चिन्हं आहे.
20 ते 22 दिवसांत आटोपणार स्पर्धा
आयपीएलचे उरलेले सामने 20 ते 22 दिवसांचा वेळापत्रक आखून त्यादरम्यान पूर्ण केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. डबल हेडर स्वरुपात सामन्यांचं आयोजन करण्यावर भर दिला जाणार असून या मार्गानं स्पर्धा लवकरात लवकर संपवण्यात येईल.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केल्यानुसार संघातील महत्त्वाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकानुसारच पुढील गोष्टींना प्राधान्य देतील. त्यामुळं इंग्लंडच्या संघातील जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, सॅम करन हे खेळाडू आयपीएलमध्ये पुन्हा सहभागी होऊ शकत नाहीत कारण त्यादरम्यानच त्यांच्या संघाचे सामने पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांशी होणार आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. अशाच परिस्थितीत देशातील परिस्थितीवर पुन्हा एकदा लॉकडाऊनचे निर्बंध आले आहेत. असं असतानाही एकिकडे यंदाच्या आयपीएल स्पर्धा रद्द झालेल्या असतानाच बीसीसीआयकडून टी20 क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात झाल्याचं कळत आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात भारत या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार असल्याचं म्हटलं जात होतं पण, आता सर्वच परिस्थिती ही कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण कितपट अटोत्यात येतं त्यावर आधारित आहे.