North Korea : उत्तर कोरियाच्या दोन विद्यार्थ्यांना चित्रपट पाहणं पडलं महागात, हुकूमशाह किम जोंग उनकडून मृत्यूदंडाची शिक्षा
Kim Jong Un : उत्तर कोरियाच्या दोन विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियन आणि अमेरिकन चित्रपट पाहिल्यामुळे आपला जीव गमवावा लागला. हुकूमशाह किम जोंग उनने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली.
North Korea Student Death : उत्तर कोरियाच्या (North Korea) दोन विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियन आणि अमेरिकन चित्रपट पाहणं महागात पडलं आहे. दक्षिण कोरियन आणि अमेरिकन पाहिल्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने (Kim Jong Un) दोन विद्यार्थ्यंना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा दावा करण्यात आला आहे. उत्तर कोरियामध्ये इतर देशाचं संगीत आणि चित्रपट पाहण्यावर बंदी आहे. कुणीही असं करताना आढळल्यास त्याला कठोर शिक्षा दिली जाते.
दक्षिण कोरियन चित्रपट पाहिला म्हणून मृत्यूदंड
द इंडिपेंडेंट वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचं वय 16 आणि 17 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांनी उत्तर कोरियातील रयांगांग प्रांताच्या शाळेत दक्षिण कोरियन आणि अमेरिकन ड्रामा शो पाहिला. द मिरर वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, या विद्यार्थ्यांनी दक्षिण कोरियन आणि अमेरिकन चित्रपट पाहिल्याने दोन्ही विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडल्याचं सांगण्यात येत आहे, पण या घटनेची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली.
विचित्र आदेशांमुळे किम जोंग उन चर्चेत
दरम्यान, याआधीही 2021 मध्ये दक्षिण कोरियन व्हिडीओ पाहिल्यामुळे सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. हुकूमशाह किम जोंग उन त्याचे विचित्र नियम आणि क्रूरतेसाठी ओळखला जातो. किम जोंग उन नेहमीच अजब फर्मान आणि नियमांमुळ चर्चेत असतो. उत्तर कोरियातील नागरिक त्रस्त आहेत, पण हे सर्व सहन करण्याशिवाय तेथील जनतेकडे दुसरा पर्याय नाही. उत्तर कोरियामध्ये हुकूमशाह किम जोंग उनने नागरिकांसाठी विचित्र नियम लागू केले आहेत.
'मुलांची नाव बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाइट ठेवा'
अलिकडे किम जोंग उनने नागरिकांसाठी नवा नियम लागू केला आहे. या नव्या आदेशानुसार, देशातील लहान मुलांची नावं बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाईटच्या नावांवर ठेवण्याचं सांगण्यात आलं आहे. किम जोंग उनने देशातील चिमुकल्यांची प्रेमळ किंवा सौम्य भावनांच्या अर्थाची नाव बदलून ती बॉम्ब आणि बंदुक ठेवण्यास सांगितलं आहे. किमच्या मते, यामुळे देशाची ताकद दिसेल असं सांगण्यात येत आहे. मात्र या विचित्र फर्मानामुळे पुन्हा एकदा उत्तर कोरियातील नागरिक संकटात सापडले आहेत.
11 दिवस हसण्यावरही घातली होती बंदी
याआधी उत्तर कोरियामध्ये 11 दिवस हसण्यावर बंदी घालण्याचा विचित्र आदेश जारी करण्यात आला होता. उत्तर कोरियाचे माजी हुकूमशाह किम जोंग-टू यांच्या निधनाच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त नागरिकांना शोक पाळण्याचा आदेश देण्यात आला होता. या 11 दिवसांच्या काळात देशातील नागरिकांच्या हसण्यावर, खरेदीवर आणि दारू पिण्यावर बंदी घालण्यात आली होती.