Ratnagiri Politics : 'निष्ठावंत वाघाची रत्नागिरीमध्ये एन्ट्री'; उदय सामंत यांच्या मतदारसंघातील बॅनरवरुन राजन साळवींच्या उमेदवारीची चर्चा
Ratnagiri Politics : वाढदिवस ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांचापण उदय सामंत यांच्या मतदारसंघात लागलेल्या बॅनरवरून साळवींच्या उमेदवारीची चर्चा'निष्ठावंत वाघाची रत्नागिरीमध्ये एन्ट्री'; बॅनरवरच्या मजकुरामुळे भुवया उंचावल्या
Ratnagiri Politics : विधानसभा निवडणुका किमान वर्षभरावर येऊन ठेपली आहे. अद्याप कोणत्या मतदारसंघात उमेदवार कोण? हे निश्चित झालेले नाही. पण अनेक संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरु झालेली आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्यामुळे शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर कोकणी माणूस कुणाच्या मागे उभा राहणार? कोकणातला विधानसभा मतदारसंघांसहित लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असणार? याबाबत आतापासूनच चर्चा सुरु झालेली आहे. अशाच एका मतदारसंघापैकी एक म्हणजे रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ! उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचा पारंपरिक हा मतदारसंघ. राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये आलेल्या उदय सामंत यांना 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलं मताधिक्य मिळालं. पण उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सामंत यांना कुणाचं आव्हान? त्यांच्यासमोर तगडा उमेदवार कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना अनेक जण राजन साळवी यांच्या नावाकडे लक्ष वेधतात. पण राजन साळवी (Rajan Salvi) मात्र अनेक वेळा मी माझ्या राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातच लढणार असं म्हणत असताना, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाबद्दल मात्र उद्धव ठाकरे यांचा आदेश मानेन अशी देखील प्रतिक्रिया देतात. त्यामुळे रत्नागिरीमध्ये राजन साळवी हे ठाकरे गटाकडून संभाव्य उमेदवार असू शकतात का? अशा चर्चा वारंवार होतात. दरम्यान राजन साळवी यांचा 9 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यापूर्वी रत्नागिरी शहरांमध्ये लागलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. कारण 'निष्ठावंत वाघाची रत्नागिरीमध्ये एन्ट्री' असा मजकूर या बॅनरवर आहे. परिणामी राजन साळवी विधानसभा निवडणुकीमध्ये आपला मतदारसंघ बदलणार का? याची चर्चा अधिक जोरात आणि जोमात सुरु झाली आहे.
नेमका अर्थ काय?
दरम्यान बॅनरवरील मजकूरचा नेमका अर्थ काय? याबाबत काही पत्रकारांशी चर्चा केली. ते म्हणाले की, "सध्या ठाकरे गटाकडे उदय सामंत यांना आव्हान देणारा चेहरा नाही. त्यामुळे राजन साळवी यांच्या नावाची चर्चा होत असल्यास आश्चर्य वाटायला नको. राजन साळवी हे मूळचे रत्नागिरीतील आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात रत्नागिरीमधून झाली. ग्रामीण भागामध्ये देखील त्यांचा संपर्क चांगला आहे. राजन साळवी सक्रिय झाल्यास शिवसेनेचे जुने निष्ठावंत त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू शकतात. शिवसेनेतल्या फुटीनंतर रत्नागिरीमधून शिवसैनिकांची किंवा जुन्या शिवसैनिकांची मोठ्याप्रमाणात फूट झालेली दिसून येत नाही. त्याचा फायदा राजन साळवी यांना होऊ शकतो. पण असं असलं तरी उदय सामंत यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. सलग चार टर्म त्यांनी आमदारकीची जबाबदारी पार पडलेली आहे. ग्रामीण भागामध्ये देखील त्यांचा संपर्क चांगला आहे. शिवाय त्यांच्या घरातून देखील त्यांना मोठा पाठिंबा आहे. आर्थिक आघाडीवर देखील राजन साळवी यांच्या तुलनेत उदय सामंत उजवे ठरतात. त्यामुळे ही लढाई नक्कीच रंजक होऊ शकते."
राजन साळवी यांची राजकीय कारकीर्द
जुना आणि निष्ठावंत शिवसैनिक अशी राजन साळवी यांची ओळख. साधारणपणे 1995 च्या दरम्यान राजन साळवी रत्नागिरीमधून नगरसेवक झाले. त्यानंतर नगराध्यक्षपदाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली. या दरम्यान राजन साळवी यांच्या खांद्यावर जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदार देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचे ते जिल्हाप्रमुख होते. सन 2000 मध्ये शिवसेनेच्या सभासद नोंदणीमध्ये राज्यात सर्वाधिक सभासद नोंदणी केली म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला. दरम्यान 2006 मध्ये झालेल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये राजन साळवी यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यानंतर राजन साळवी आमदार झाले. सध्या राजन साळवी रत्नागिरी-लांजा-साखरपा या मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार आहेत. मालमत्ता वाढीप्रकरणी साळवी यांची सध्या अलिबाग येथील एसीबी कार्यालयामध्ये चौकशी सुरु आहे. पण हे सर्व राजकीय दबावापोटी सुरु असून मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली आहे.
हेही वाचा
Ratnagiri News : उदय सामंत यांच्यासमोर राजन साळवी यांचं आव्हान उभं करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न?