BLOG : 'दिग्दर्शकांवर विश्वास ठेवा', दिग्दर्शक ब्रेडी कॉबटचे खडे बोल!
दिग्दर्शक ब्रेडी कॉबटचा द ब्रुटालिस्ट (२०२४) सिनेमा गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ठरलाय. बेस्ट मोशन पिश्चर ड्रामा सहित बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट ॲक्टर ड्रामा (एड्रियन ब्रोडी) असे तीन महत्त्वाचे पुरस्कार द ब्रुटालिस्टनं पटकावले. सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार स्विकारताना दिग्दर्शक ब्रेडी कॉबट यानं एक महत्त्वाचं विधान केलंय. सिनेमाच्या फायनल कटवर फक्त दिग्दर्शकाचा हक्क असायला हवा. म्हणजे दिग्दर्शकाला हवा तसाच सिनेमा रिलीज केला जावा, यात इतर कुणीही हस्तक्षेप करु नये असं ब्रेडीनं म्हटलं. हे असं बोलण्यामागे काही कारणं आहेत. ती ही त्यांनी सांगितली.
द ब्रुटालिस्ट सिनेमाची लांबी ३ तास ३५ मिनिटांची आहे. हॉलीवूडमध्ये सर्वसाधारणपणे सिनेमाची किमान लांबी दीड ते जास्तीत जास्त २ तास असते. अशावेळी साडे तीन तासांपेक्षाही जास्त लांबीचा सिनेमा रिलीज करताना अडचणी आल्या. कुणी सिनेमा वितरण करायला तयार नव्हता. या सिनेमाच्या वेळेत दोन हॉलीवूडचे सिनेमे दाखवले जावू शकत होते. अशावेळी दिग्दर्शक ब्रेडी कॉबटवर सिनेमाची लांबी कमी करण्यासाठी सतत दबाव आला. एका आर्किटेकच्या आयुष्यावर बेतलेल्या सिेनेमावर साडे तीन तास घालवायला प्रेक्षक तयार होतील का याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली. ब्रेडी नमला नाही. त्यानं सिनेमा आहे त्याच स्थितीत रिलीज होईल यासाठी आपला हट्ट् कायम ठेवला. अखेर अमेरिकेत ए २४ आणि युरोपमध्ये युनिव्हर्सल पिश्चर आणि फोकस पिश्चरने सिनेमा रिलीज केला.
सिनेमाच्या लांबीवर उपाय म्हणून सिनेंमात एक मध्यंतर देण्यात आलाय. अमेरिकेत २० डिसेंबरला आणि इंग्लंड आणि इतर युरोपीयन देशात २४ डिसेंबरला सिनेमा रिलीज झालाय. आशियाई देशांमध्ये हा सिनेमा अजून रिलीज व्हायचा आहे. सिनेमाची लांबी कमी करण्याच्या दबावामुळं ब्रेडी इतका त्रस्त झाला होता की त्यानं आजं अवार्ड स्विकारताना आपला राग सर्वांसमोर जाहीर केला. दिग्दर्शकला आपल्या सिनेमाचा खरा अंदाज असतो. त्यामुळं या दिग्दर्शकांवर विश्वास ठेवा असं आवाहन त्यानं गोल्डन ग्लोब्सच्या व्यासपीठावरुन केलं. या वक्तव्याला वादग्रस्त म्हटलं जाऊ शकतं याचा अंदाज त्याला आहे. दिग्दर्शकांवर विश्वास ठेवा हेच आपल्याला सांगायचं आहे. कुठलाही वाद तयार करायचा नाही असं सांगायला तो विसरला नाही.
द ब्रुटालिस्ट (२०२४) सिनेमाचा वर्ल्ड प्रिमियर व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. त्यानंतर अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमा गाजला. त्यानंतर लगेच सिनेमा रिलीज करण्याचा ब्रेडीचा मानस होता. पण डिस्ट्रीब्युटर मिळत नसल्यानं सिनेमाची थिएट्रीकर रिलीज लांबलं. यातून सिनेमा क्षेत्रात सुरु असलेल्या निर्माता-दिग्दर्शक आणि डिस्ट्रीब्युटर्स (वितरक) यांच्यातली रस्सीखेच नव्यानं चर्चेचा विषय बनलेय.
हॉलीवूडमध्ये डिस्ट्रीब्युटर्स आणि कधी कधी निर्माते तिकिट खिडकीवरच्या कमाईचा विचार करुन दिग्दर्शकानं सिनेमाचं फायनल कट करावं यासाठी दबाव आणला जातो. हे अगदी पुर्वीपासून सुरु आङे. दिग्दर्शकाला सिनेमाचा फायनल कट निर्मात्या कंपनीकडे द्यायचा असतो. त्यानंतर ते निर्माते तो घेऊन डिस्ट्रीब्युटर्स अर्थात वितरकांकडे जातात. इथं मग कलात्मकतेफेक्षा तिकिट खिडकीचा विचार व्हायला लागतो. इथंच दिग्दर्शक, निर्माते आणि वितरकांमध्ये वादाला सुरुवात होते. आपल्या कलाकृतीवर निर्माते किंवा वितरकांचा वरचश्मा नसावा असं प्रत्येक दिग्दशकाला वाटतं. सर्वच दिग्दर्शकांना या वादाला सामोरं जावं लागलंय. यावर वर्तमानपत्रांमधून अनेक बातम्या यायच्या. पण यंदा पहिल्यांदाच गोल्डन ग्लोब्स अवार्ड सारख्या व्यासपीठावर ब्रेडीनं दिग्दर्शकांनं यावर आपलं मत मांडलंय. यातून हॉलीवुड दिग्दर्शक निर्माते, वितरकांमध्ये नवा सामना सुरु होणार यात शंका नाही.
द ब्रुटालिस्ट हा सिनेमा आर्किटेक-डिजायनर लॅझलो थ़ॉत यांच्या कारकिर्दीचा वेध घेतो. लॅझलो ज्यू आहे. दुसऱं महायुध्द सुरु झाल्यानंतर तो आपल्या काही मित्रांसोबत हिंगेरीतून अमेरिकेला पलायन करतो. अमेरिकेत आल्यावर युरोपातल्या या गाजलेल्या आर्किटेकची अस्तित्वाची लढाई सुरु होते. ब्रुटालिस्ट सिनेमाच्या माध्यमातून अवाढव्य इमारती उभारण्याचा अमेरिकन आणि युरोपीयन दृष्टीकोन स्पष्ट करण्यात आलाय. युरोपात इमारत निर्मितीच्या कलात्मक बाजूवर भर दिला गेलाय. तर अमेरिकेत त्याची उपयोगिता आणि भव्यता यावर जोर दिला जातो. वास्तूशास्त्राच्या जा दोन प्रवाहांमध्ये अडकलेल्या लॅझलो थ़ॉतची गोष्ट लांबलचक असली तरी ती रंजक आहे.
(यालेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, marathi.abplive.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही)