एक्स्प्लोर
Advertisement

व्हॅलेन्टाईन्स डेला प्रेम महागणार, गुलाबाचं उत्पादन घटलं; एक गुलाब तब्बल 30-50 रुपये!
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबाचं उत्पादन वीस टक्के घटलं आहे. त्यामुळे व्हॅलेन्टाईन्स डे दरम्यान बाजारात गुलाबाची कमतरता भासणार आहे. त्यामुळे प्रेमीयुगुलांना एका गुलाबासाठी 30 ते 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

पिंपरी चिंचवड : वातावरणातील बदलाचा मोठा फटका गुलाब शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीस टक्के उत्पादन घटलं आहे. त्यामुळे व्हॅलेन्टाईन्स डे दरम्यान बाजारात गुलाबाची कमतरता भासणार आहे. याचा फायदा व्यापारी घेणार असून प्रेमीयुगुलांना प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या का गुलाबासाठी 30 ते 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
वरुणराजा यंदा ऑक्टोबरपर्यंत बरसला. ही बाब गुलाब शेतकऱ्यांसाठी लाभदायक असते, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक निर्यातयुक्त गुलाब बहरेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण डिसेंबरमध्ये अवेळी पडलेला पाऊस आणि जानेवारीत अतिउष्ण वातावरणामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.
पुण्याच्या मावळ तालुक्यातील जयसिंग हुलावळे हे गुलाब शेती करतात. प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या गुलाबाने त्यांना गेली दोन वर्ष गुलाबी नोटा मिळवून दिल्या. यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत झालेला पाऊस त्यांना भरारी देईल, या आशेने त्यांनी मशागतीला चांगला जोर लावला. पण उलट वातावरण अतिउष्ण झाल्याने त्यांना 25 टक्क्यांचा फटका बसला आहे. चार एकरच्या पॉली हाऊसमधून 2018 च्या व्हॅलेन्टाईन दरम्यान 22 लाख तर 2019च्या व्हॅलेन्टाईन्स दरम्यान 25 लाख रुपयांचा त्यांना नफा झाला होता. यंदा मात्र सात ते आठ लाखांचं नुकसान त्यांना झेलावं लागलं आहे.
तळेगाव एमआयडीसी परिसरातील बीएससी अॅग्रीचे शिक्षण घेतलेले दिलीप दळवी ही यंदा चिंतेत आहेत. बागायत शेतीपेक्षा गुलाब शेतीत पैसा अधिक खेळतो म्हणून त्यांनी पॉलिहाऊस उभारलं. अडीच एकर शेतीतून 2018 सालच्या व्हॅलेन्टाईन्सला दहा लाख आणि 2019च्या ही व्हॅलेन्टाईन्सला दहा लाख रुपये खिशात पडले. पण यंदा बदललेल्या वातावरणामुळे मात्र पाच लाख रुपये मिळण्याची ही शाश्वती नाही.
व्हॅलेन्टाईन्ससाठी भारतातून देशभर निर्यात होणाऱ्या गुलाबमध्ये मावळाचा पन्नास टक्क्यांचा वाटा असतो. त्यामुळे जयसिंग हुलावळे आणि दिलीप दळवींप्रमाणे सव्वा दोनशे हेक्टरवर गुलाब शेती करणारे शेतकरी चिंतेत आहे. यंदा सरासरी वीस टक्के तोटा सर्वांना सहन करावा लागणार आहे, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनल्स (आयएसएफपी)चे अध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी दिली. 2018 आणि 2019 साली 56 ते 57 कोटी रुपयांची उलाढाल गुलाब शेतीतून झाली होती. यंदा सरासरी 20 टक्के उत्पादन घटल्याने 50 कोटींच्या आतच उलाढाल होणार आहे.
वातावरणातील बदलाचा हा फटका शेतकऱ्यांना बसणार असताना, व्यापाऱ्यांचं मात्र फावणार आहे. कारण उत्पादन घटल्याने यंदा बाजारात गुलाबाची कमतरता भासेल. परिणामी व्यापारी प्रेमी युगुलांना लुटण्याची तयारी करत आहेत. हे पाहता यंदा प्रेमी युगुलांना एका गुलाबासाठी 30 ते 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
50 दिवसांच्या मशागतीनंतर 10 हजार फुलांमागे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये फायदा होईल. तिथेच ही 10 हजार फुलं व्यापाऱ्याला दोन-तीन दिवसातच बसल्या जागी एक लाख रुपये मिळवून देणार आहेत. यंदा उत्पादन घटलं असलं तरीही पुण्यातून 35 लाख फुलं उत्पादनाचं टार्गेट आहे, तेव्हा शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी यंदा कसे मालामाल होतील याचा विचार न केलेलाच बरा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
